Pages

Wednesday, October 19, 2011

माझी आवडती गाणी

नमस्कार,

मराठीमध्ये खुप सुंदर आणि छान छान गाणी आहेत.
भावगीत, नाट्यसंगीत, लावणी, पोवाडे अशी विविध प्रकारची गाणी आहेत.
त्या त्या वेळेस आपला जो मूड असेल त्याप्रमाणे तो तो प्रकार ऐकायला आवडतो.
पण ही जी तीन गाणी आहेत ती मला कुठल्याही वेळेस ऐकायला आवडतात,
आणि त्याप्रमाणे माझा मूड आपोआप बदलतो.

"एका तळ्यात होती" हे गाणे माझे सर्वात आवडते.
लहानपणी हे गाणे ऐकायच्या आधी आईने ह्याची गोष्ट सांगितली होती.
ती गोष्टच मला इतकी आवडली होती, कि हे गाणे जेव्हा प्रथम ऐकले तेव्हापासून त्याच्या प्रेमात पडलो.
ह्या गाण्याचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्हालाही हे गाणे खूप आवडेल. 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक 

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक 

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक 
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक 

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक 

गाणे ऐका





कसे वाटले गाणे? खूप सुंदर आहे ना?


"आकाशी झेप घे रे पाखरा" हे असेच एक सुंदर गाणे.
त्यातील अर्थ इतका भन्नाट आहे.
माझी मुले ज्यावेळेस एक एक करून पुणे सोडून गेली, त्यावेळेस ती आता आपल्यापासुन लांब गेली ह्याचे खुप वाईट वाटले होते. 
आणि त्याच वेळेस हे गाणे कानावर पडले.
मुलांनी झेप नाही घेतली तर ते आकाशाची मजा कशी चाखणार हे मला जाणवले.


आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा

चला हे गाणे पण ऐकू या..




गाणे ऐकून थोडे एन्करेज झाल्यासारखे वाटले ना?


"या चिमण्यांनो परत फिरा रे" ह्या गाण्यातील अर्थ ज्यांची मुले जवळ नाहीत,
आणि आई बाप आपले त्यांच्या भेटीची वाट बघत बसले आहेत, त्यांना जास्त जाणवेल.
हे गाणे ऐकताना मुलांची खूप आठवण येते, पण त्यांच्या भविष्याचा विचार करून गप्प बसावे लागते.


या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, तळाकडे उतरल्या

अवतीभवती असल्यावाचुन, कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधिही कामाचा
या बाळांनो, या रे लौकर, वाटा अंधारल्या


नीट लक्ष देऊन ऐका..


काय हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले की नाही?

आहेत की नाही तीनही गाणी सुंदर? प्रत्येकाचा भाव वेगळा, आनंद वेगळा.
माझ्यासारख्या, ज्याला गाण्यातले काहीही कळत नाही,
त्याला सुद्धा ही गाणी मोहून टाकतात, गाणी ऐकताना गहिवरून येतं, म्हणजे त्यात काही जादू असलीच पाहिजे.

चलो बाय, जमल्यास परत भेटू..