Pages

Saturday, June 2, 2012

आमच्याकडची एक जुनी प्रथा


तुम्हाला आमच्याकडची एक  जुनी प्रथा सांगतो.

आमच्याकडे दिड  दिवसांचा गणपती असतो. गणपतीला गोड मोदक आणि ईतर बिन कांदा लसणाचा शाकाहारी नैवेद्य असतो. बहुतेक  सर्वत्र हेच असते.

मग  गणपती  गेले की गौरी येतात. गौरी बसतात त्या दिवशी परत शाकाहारी नैवेद्य. पण  दुसऱ्या  दिवशी  गौरीचे मुख्य जेवण म्हणजे  मटण. कारण  का  तर गौरी  म्हणजे माहेरवाशीण. तीला शंकराकडे  असले काही  मिळत  नाही. म्हणजे तिकडे ह्या गोष्टीचा शब्दोच्चार  पण  नाही. म्हणून  तिच्या  आवडीचे आणि तिला सासरी मिळत  नाही ते मटण  हे  मुख्य जेवण.

आता  गणपती  बाप्पांचे  नाक  म्हणजे केव्हढे  लांब. त्याला  घरी जाता जाता  वास  येतो. घरी गेल्यावर तो  त्याच्या बाबांकडे  त्याची शंका व्यक्त  करतो. शंकर महाराज म्हणजे शीघ्र कोपी. ते लगेच  निघतात  काय  चाललेय  ते बघायला. पण इकडे  येवून  बघतात  तर काय  जेवणात  सर्व शाकाहारी आणि छान  छान  गोड प्रकार.

कारण  असे होते की मटण  खाऊन  तृप्त  झाल्यावर दुसऱ्या दिवशी  सकाळी सकाळी  गौरी बाईंना गणपतीच्या चुगलखोरी बद्दल शंका येते. ती सगळ्यांना सांगते की आता पटापट  आवरा आणि आज  फक्त  शाकाहारी जेवणच करा. म्हणून  तिसऱ्या  दिवशी आमच्याकडे फक्त  शाकाहारीच नैवेद्य  असतो. हे सर्व  शंकर देव बघतात  त्यावेळेस  त्यांचा राग शांत  होतो, कारण  शंकर देव  यायच्या आत सगळे  चकाचक झालेले   असते.

गोष्ट  छान आहे कि नाही? पण  मतीतार्थ लक्षात  घ्या.  देवाच्या नावाने प्रथा कशी पडते हे लक्षात  येईल.

(गंमतीची गोष्ट बघा, सी.के.पी. माहेरवाशीण शंकर आणि गणपती सारख्या  देवांना सुद्धा उल्लु  बनवते..
हे गमतीत  हं नाहीतर ह्याच्यावर चर्चा कराल.)