निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आता काही दिवसात सर्व राजकीय पक्षांचे ५ वर्षांसाठीचे वचननामे जाहीर होतील. भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई, चलनवाढ, हेच विषय उगाळले जातील. कुठल्याही राजकीय पक्षाकडे ह्याच्या पलीकडे जाऊन वरील विषयाच्या मुळाशी जाण्यात अजिबात इच्छा नाहीये.
स्व. संजय गांधी हा एकुलता एक राजकीय नेता होता की त्याने मूळ विषयाला हात घातला होता, तो विषय म्हणजे कुटुंब नियोजन, अर्थात लोकसंख्या वाढीस आळा घालणे. पण नोकरशाहीने त्याचा अतिरेक केला, आणि काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. आणि त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी हा विषय विषाप्रमाणे बाजुला ठेवला.
खायला पुरेसे अन्न नाही, दिवसभर कष्ट करून रात्री विरंगुळा म्हणून पिढ्याच्या पिढ्या निर्माण करणाऱ्या झोपडपट्ट्या वाढत आहेत. परीक्षा न देता आठवीपर्यंत नापास न करणाऱ्या शिक्षण योजना होत आहेत. अशा प्रकारे काहीही न येणारे सो कॉल्ड शिक्षित बेरोजगार वाढत आहेत. कितीही आणि कोणीही आणि काहीही वल्गना केल्या तरीही वाढत्या लोकसंख्येला आपण किती रोजगार पुरवणार आहोत? आणि ह्या वाढत्या बेरोगारांचा राजकीय कारणांसाठी वापर करून गुंड्गीरीपासून कितपत रोखू शकणार आहोत? आणि ह्या गुंडांना पोसण्यासाठी भ्रष्टाचार करण्यापासून ह्या राजकीय नेत्यांना कोण रोखू शकणार आहे? हा विषय इतका नाजूक आहे, पण सर्व क्षेम व्हावे अशी मनापासून इच्छा असेल तर कुटुंब नियोजन हाच एकमेव पर्याय आहे.
अजून सुद्धा लोकसंख्या वाढ, किंवा कुटुंब नियोजन ह्या विषयाला शिवायची हिम्मत एकसुद्धा राजकीय पक्ष दाखवत नाही. स्वतःला धाडसी आणि हिम्मतवान समजणाऱ्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालच्या कोणत्याही भाषणात ह्याचा उल्लेख देखील होत नाही. स्व. संजय गांधी ह्यांचे सुपुत्र वरूण गांधी सुद्धा ह्या विषयावर कधी बोललेला आढळत नाही. नरेंद्र मोदी काय आणि राहुल/सोनिया गांधी काय, फक्त गोड गोड स्वप्ने लोकांच्या समोर ठेवून सगळ्यांना फसवायच्या चढाओढीत मग्न आहेत.
माझे सर्व मतदारांना एकच आवाहन आहे, आपल्या घरी जो कोणी उमेदवार प्रचारासाठी येईल त्याला ह्या विषयाबद्दल त्याचे मत काय हे विचारा. जर तो बोलायला तयार नसेल तर असल्या भित्र्या आणि अदूरदर्शी उमेदवाराला खड्यासारखे बाजूला ठेवा. माझा हा विचार आपल्याला पटला तर इतरांना त्यासाठी प्रवृत्त करा.
शेवटी आपल्या पुढच्या पिढीची काळजी वाटते म्हणून हे आवाहन. नाहीतर काय, खाणारा खाणारा खातोय, मरणारा मरतोय; कष्टकरी थकतोय, गुंड मजा करतोय; फसणारा फसतोय, खोटे आश्वासन देणारा राज्य करतोय हे बघणे आहेच.