Pages

Saturday, June 2, 2012

आमच्याकडची एक जुनी प्रथा


तुम्हाला आमच्याकडची एक  जुनी प्रथा सांगतो.

आमच्याकडे दिड  दिवसांचा गणपती असतो. गणपतीला गोड मोदक आणि ईतर बिन कांदा लसणाचा शाकाहारी नैवेद्य असतो. बहुतेक  सर्वत्र हेच असते.

मग  गणपती  गेले की गौरी येतात. गौरी बसतात त्या दिवशी परत शाकाहारी नैवेद्य. पण  दुसऱ्या  दिवशी  गौरीचे मुख्य जेवण म्हणजे  मटण. कारण  का  तर गौरी  म्हणजे माहेरवाशीण. तीला शंकराकडे  असले काही  मिळत  नाही. म्हणजे तिकडे ह्या गोष्टीचा शब्दोच्चार  पण  नाही. म्हणून  तिच्या  आवडीचे आणि तिला सासरी मिळत  नाही ते मटण  हे  मुख्य जेवण.

आता  गणपती  बाप्पांचे  नाक  म्हणजे केव्हढे  लांब. त्याला  घरी जाता जाता  वास  येतो. घरी गेल्यावर तो  त्याच्या बाबांकडे  त्याची शंका व्यक्त  करतो. शंकर महाराज म्हणजे शीघ्र कोपी. ते लगेच  निघतात  काय  चाललेय  ते बघायला. पण इकडे  येवून  बघतात  तर काय  जेवणात  सर्व शाकाहारी आणि छान  छान  गोड प्रकार.

कारण  असे होते की मटण  खाऊन  तृप्त  झाल्यावर दुसऱ्या दिवशी  सकाळी सकाळी  गौरी बाईंना गणपतीच्या चुगलखोरी बद्दल शंका येते. ती सगळ्यांना सांगते की आता पटापट  आवरा आणि आज  फक्त  शाकाहारी जेवणच करा. म्हणून  तिसऱ्या  दिवशी आमच्याकडे फक्त  शाकाहारीच नैवेद्य  असतो. हे सर्व  शंकर देव बघतात  त्यावेळेस  त्यांचा राग शांत  होतो, कारण  शंकर देव  यायच्या आत सगळे  चकाचक झालेले   असते.

गोष्ट  छान आहे कि नाही? पण  मतीतार्थ लक्षात  घ्या.  देवाच्या नावाने प्रथा कशी पडते हे लक्षात  येईल.

(गंमतीची गोष्ट बघा, सी.के.पी. माहेरवाशीण शंकर आणि गणपती सारख्या  देवांना सुद्धा उल्लु  बनवते..
हे गमतीत  हं नाहीतर ह्याच्यावर चर्चा कराल.)

Tuesday, May 8, 2012

पुष्कर तलाव, राजस्थान





पुष्कर हे हिंदू धर्मियांचे एक  मुख्य तीर्थस्थान आहे. ब्रम्हदेवाचे एकुलते एक  मंदिर पुष्कर येथे आहे. पुष्कर येथे आल्याशिवाय  चार धाम यात्रा  पूर्ण  झाली  नाही असे म्हणतात.  पर्यटक  अजमेरच्या दर्ग्याला भेट देतात, पण  पुष्कर हे तीर्थस्थान अजमेर पासून खूप जवळ आहे हेसुद्धा बऱ्याच जणांना माहित नसते. इथला गुलकंद  भारतभर प्रसिद्ध  आहे. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. राजस्थान  टूरमध्ये पुष्कर हे स्थळ आवर्जून  पाहावे असा फुकटचा सल्ला मी देऊ इच्छितो.


सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण





सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण ऐकले. १०० टक्के सत्य आहे.
आम्ही सूरपारंब्या खेळलो, मुले विटी-दांडू सुद्धा खेळू शकली नाही.
आम्ही चिन्चा, कैऱ्या पाडून  खाल्ल्यात, मुलांना त्या दुकानात विकत घेऊन खाव्या लागल्या.
आम्ही नदीचे पाणी प्यायलो आहोत, हल्ली नदीचा वापर सांडपाण्यासारखा होतोय.

आमच्या शिक्षकांच्या हातात छडी असे, आमची मुले शिक्षकांच्या खांद्यावर हात टाकून चालतात.
३० पर्यंत पाढे आमच्या अजून लक्षात आहेत, मुलांना टू इंटू टू साठी काल्क्यूलेटर लागतो.

आमच्या वेळेस फुटपाथवर लोक चालायचे, हल्ली फुटपाथ विक्रेत्यांसाठी राखीव असल्यासारखे झालेत.
आम्ही दहा दहा किलोमीटर गप्पा मारत चालत जायचो, हल्ली रस्ता ओलांडायला जीव मुठीत धरावा लागतो.
आम्ही आजोबांना दवाखान्यात घेऊन जायचो, आता मुलांसाठी दवाखान्यात जावे लागते.
मोकळ्या हवेत फिरले कि फ्रेश वाटायचे, आता कधी एकदा ह्या धुराड्यातून सुटून घरात पोचतो असे वाटते.

सगळे काही बदलून गेलेय. निसर्ग बदललाय, शिक्षणपद्धती बदललीय, शिस्त बिघडलीय.
आमच्या मुलांची हि परिस्थिती, तर सेवेम सुझुकी म्हणते तसे खरेच त्यांच्या मुलांची काय परिस्थिती असेल?
वेळेत जागे झालो नाही तर भविष्यात चंद्रावरच्या जागेसाठी पृथ्वीवर युद्धे झाली तर आश्चर्य वाटू नये.

Monday, March 26, 2012

किल्ले सिंधुदुर्ग, मालवण

पोर्तुगीज, ब्रिटीश आणि मोघलांवर लक्ष ठेवण्यासाठी सन १६६४ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. मालवण शेजारी एका दगडी बेटावर हा किल्ला बांधला असून सर्व बाजूंनी समुद्राने वेढला गेला आहे. गोव्यावरून शंभरेक तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ३००० कामगारांकडून ह्या किल्ल्याचे बांधकाम करून घेतले आहे. बांधकामासाठी त्या बेटावरच्याच मोठमोठ्या खडकांव्यातिरिक्त २००० खंडी लोखंड वापरण्यात आले. भक्कम पायाभरणीसाठी काही खंडीभर शिश्याचा वापर केला गेला.


किल्ला पाहायला सुमारे एक तास तरी लागतो. पण किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्र पाहण्याची मजा काही औरच आहे. हा व्हिडीओ उन्हाळ्यात घेतला आहे, पावसाळ्यानंतर छान हिरवेगार वातावरण असते.




आशा आहे हा व्हिडीओ पाहिल्यावर आपणपण ह्या किल्ल्याला जरूर भेट द्याल.