मुंबई विमानतळाबाहेर |
८ जानेवारी २०२०, भल्या सकाळी पावणे तीन वाजता ब्रिटिश एअरलाईन्सच्या विमानाने मुंबई विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केले. प्रसन्नकडे टोरोंटोला जाण्यासाठी व्हाया लंडन ही फ्लाईट बुक केली होती. एक डुलकी झाल्यावर गरम गरम चिकन पास्ता आला. तो खाऊन झाल्यावर आमचा टाईम पास सुरू झाला. समोरच्या स्क्रीनवर सिनेमे, गेम्स बरेच काही होते. काही वेळाने ते पण बोअर झाले. मग आमचे फ्लाईट ट्रॅकिंग सुरू झाले, आता विमान कुठल्या प्रदेशावरून चालले आहे, लंडनला पोचायला किती वेळ आहे वगैरे. डुलकी लागली तेंव्हा गल्फ प्रदेशावरुन विमान चालले होते. आणि आता जाग आली बघतो तर ट्रॅकिंग सिस्टिम बंद होती. थोड्याच वेळात कॅप्टनची अनाउन्समेंट चालू झाली. मी झोपेत असल्यामुळे नीट लक्ष दिले नाही. पण जेव्हा लँडिंग सुरू झाले तेव्हा बाहेरचा एअरपोर्ट खूपच लहान वाटला. काहीतरी गडबड असावी अशी शंका आलीच. विमान थांबले आणि कॅप्टनने प्रवाशांबरोबर संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान मार्ग बदलून अथेन्सला उतरविण्यात आले आहे. उद्या सकाळी ह्याच विमानाने आपण लंडनला जाऊ. त्यासाठी सकाळी साडे सहाला सर्वांना हॉटेलवरून पिकअप केले जाईल.
आयला, हा काय घोळ, आता पुढे काय, पुढच्या कनेक्टींग फ्लाईटचे काय. आमच्यासारखे अगदी मोजकेच सोडले तर बाकी सर्व कामानिमित्त प्रवास करणारे होते. त्यांच्या अपॉईंटमेंटचे बारा वाजले होते. बऱ्याच जणांना लंडनहून इतर देशांना जायचे होते. सगळेच गोंधळाचे वातावरण होते. बऱ्याच वेळाने आम्हाला विमानातून उतरवले आणि एअरपोर्ट लाउंज वरील एका छानशा कॅन्टीनमध्ये नेऊन बसवले. खायची, प्यायची, वॉशरूम ची सोय करून दिली. मुख्य म्हणजे वाय फायची सोय होती, त्यामुळे लगेच मुलांशी कॉन्टॅक्ट करता आले. पुष्कर जागाच होता, पण प्रसन्न दीपाली गाढ झोपेत होते, त्यांना उठवले. दोघांनाही परिस्थिती सांगितली. अमृता बरोबर पण बोललो. सगळे काळजीत होते. आम्ही सुरक्षीत आहोत हे ऐकून ते निवांत झाले. प्रसन्न सकाळी एअरलाईन्स कडे चौकशी करणार होता. पुष्करने इंटरनेट वर नक्की काय बातमी आहे हे पाहून आम्हाला अथेन्सला आलो हे किती बरे झाले हे सांगितले.
अथेन्सच्या एअरपोर्ट लाउंजमधून सुंदर दृष्य |
झाले असे होते की एक युक्रेनियन विमान तेहरान विमानतळावरून उड्डाण केल्याबरोबर पाडण्यात आले. त्यात बरेचसे इराणी प्रवासी होते. ही घटना समजल्यावर पुढील धोका ओळखून ब्रिटिश एअरवेजने नेहमीची हवाई पट्टी बदलून विमान अन्य मार्गाने लंडनला नेण्याचे ठरवले. मार्ग बदलून विमान वळले, आणि थोड्याच वेळात, वीसेक मिनिटात इराणने अमेरिकी सैनिकी तळांवर गोळीबार केला. ही बातमी समजल्यावर मी ब्रिटिश एअरवेज आणि देवाचे मनोमन आभार मानले. त्यानंतर खरे तर ब्रिटिश एअरवेजचा अथेन्सला फ्युएल भरून लगेचच उड्डाण करायचा बेत होता. पण मार्ग बदलून अथेन्सला पोचण्यात एवढा वेळ गेला की विमानातील क्र्यूच्या वेळेची मर्यादा खूपच लांबली गेली. त्यामुळे विमान एक दिवस अथेन्सलाच थांबवण्यात आले. एरवी माझी खूप चिडचीड झाली असती, पण विमानातील क्र्यूच्या ड्युटिजचा खडतरपणा, अमृताची जी दमछाक होत असते, त्यामुळे मला चांगलाच माहीत होता. म्हणून बीपी नॉर्मल ठेवून मी शांतपणे पुढील प्रवासाची वाट पहात बसलो.
आता इकडे अथेन्स विमानतळावर एवढ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये जागा मिळवणे अवघड झाले होते. आणि बहुधा ट्रान्झिट व्हिसा मिळणे पण अशक्य झाले असावे. म्हणून मग एअरलाइन्सने अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली. ज्यांच्याकडे शांजेन व्हिसा होता, त्यांची हॉटेल मध्ये सोय करून पाठवण्यात आले. नंतर ज्यांची लहान मुले होती त्यांना दुपारी दोनच्या फ्लाईटने लंडनला पाठवण्यात आले. आता मला आपले काय ह्याची काळजी वाटायला सुरुवात झाली. फक्त आम्ही दोघेच नाही, तर बरोबर धाकटी मेव्हणी पण होती. काहीही झाले तरी तिला आमच्या बरोबरच ठेवा असे त्यांना विनवून सांगितले. त्यांनी विचारले की उद्या सकाळी नऊ वाजता एअर कॅनडाची टोरोंटोला जाण्यासाठी एक फ्लाईट आहे, त्याने तुम्हाला पाठवले तर चालेल का? मला काय, कसेही करून घरी पोहोचणे महत्त्वाचे होते. मी लगेच होकार दिला. अशाच प्रकारे त्यांनी अनेक एअर लाईन्स बरोबर कॉन्टॅक्ट करून शक्यतो बऱ्याच जणांची सोय केली. आमच्याकडुन पासपोर्ट आणि बॅगेज स्लिप्स घेतल्या. हळू हळू एकेकाला नवीन बोर्डिंग पासेस आणि बॅगेज स्लिप्स देणे चालू झाले. इकडे प्रसन्न ब्रिटिश एअरलाईन्सच्या साईटवर अपडेट बघत होता. तिथे त्याला आमच्या पुढच्या प्रवासाचे वेळापत्रक कळले, आणि त्याने ते आम्हाला लगेच कळवले. एअरलाईन्सच्या साईटवर अपडेट झाले म्हटल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मग एकेकजण गप्पा मारायला लागला. त्यांना सांगितले साईट वरचे अपडेट बघा, म्हणजे तुमची पुढची काय सोय खाली आहे ते कळेल. अशा प्रकारे गप्पा मारत, खातपीत, एअर पोर्ट लाउंजवर चक्कर मारत वेळ घालवत बसलो.
जेवढे शक्य होते तेवढ्या सर्वांची सोय झाली. पण काही तरुण मुलांना कुठलीही फ्लाईट मिळू शकली नाही, किंवा कुठेही हॉटेल मध्ये पाठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना सांगण्यात आले की आजची रात्र इथेच एअरपोर्ट वर झोपून काढावी लागणार, आणि उद्या सर्वांना लंडनला नेण्यात येईल. अरे बापरे, बिचारे. तरुण होते म्हणून काय झाले, रात्रभर सोफ्यावर झोपायचे म्हणजे कटकटच ना. पण त्यांची तयारी होती. आणि बहुतेक मुलांनी ऑनलाईन काम करायला सुरुवात पण केली होती. ब्रिटिश एअर लाईन्सचा ऑफिसर काहीही न खातापिता अखंड फोनवर सगळ्यांची सोय करण्यात मग्न होता. ज्यांची सोय झाली नव्हती त्या सर्वांना अतिशय शांततेने उत्तरे देत होता. आपल्याकडे अशी परिस्थिती असती तर काय झाले असते असे चटकन मनात येऊन गेले. खेकसाखेकसी, आरडाओरडा, उद्धटपणा, उपकार करतोय ही भावना ह्याचा कुठे लवलेशही नव्हता. आतापर्यंत बऱ्याच जणांना पुढचा बोर्डिंग पास मिळाला होता. आमची पावणे सातची फ्लाईट होती, पण आमचा बोर्डिंग पास अजून हातात आला नव्हता. त्या ऑफिसरला विचारले की एकच उत्तर, काळजी करू नका. शेवटी साडेपाचला बोर्डिंग पास मिळाला, आणि इथून निघणार ह्याची खात्री झाली. मग कधीकाळी, काही का कारणाने असो, आपण ग्रीसला आलो होतो ह्याची आठवण असावी म्हणून तिथे फ्रीज मॅग्नेट विकत घेतली आणि बोर्डिंग गेट वर गेलो. पावणे सातची फ्लाईट साडेसातला सुटली.
अथेन्स एअरपोर्टवर |
हिथ्रो एअरपोर्टवर उतरल्यावर सर्वप्रथम ब्रिटिश एअर लाईन्सच्या काउंटरवर गेलो. त्या लोकांना सगळी कल्पना होतीच. त्यांनी आमची हॉटेलची, जेवायची, हॉटेलला जायची यायची सोय केली होती. त्या सगळ्यांची कुपन्स घेऊन फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो. गरम गरम जेवण करून रूम मध्ये जाऊन जो आडवा झालो. पण कशी बशी चार तास झोप झाली. भल्या पहाटे साडेचारला उठून परत हिथ्रो एअरपोर्टला निघालो. ह्यावेळी काहीही कटकट न होता शांतपणे वेळेवर टोरोंटोला उतरलो. उतरताना बाहेरचे दृश्य खूप सुंदर होते. सर्व परिसर बर्फाच्छादित होता. आम्हाला हे नवीन होते. ईमिग्रेशन पटकन झाले, आणि बॅगा घ्यायला गेलो. आमच्या चारही बॅगा पटापट आल्या. आता नूतनच्या बॅगा आल्या की निघायचे म्हणून त्याची वाट बघत बसलो. पण तिची एकही बॅग यायला तयार नाही. शेवटी बॅगेज चौकशी काऊंटरला गेलो. तिथल्या माणसाने बॅगेज स्लीप वरून बॅगा आल्या का नाही हे पाहिले. त्या आमच्या फ्लाईटने आल्याच नव्हत्या, दुसऱ्या फ्लाईटने निघाल्या होत्या. अथेन्सला ऐनवेळी एवढ्या लोकांच्या बॅगा इकडून तिकडे, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागल्या म्हणून काही अडचणी निर्माण झाल्या असाव्यात. शेवटी त्यांनी तिथेच एक फॉर्म भरून घेतला, आणि लवकरात लवकर बॅगा घरी येतील असे आश्वासन दिले. बॅगा खरोखरीच त्याच रात्री, एअरलाइन्सच्या दिलगिरी पत्राबरोबर घरी पोचल्या.
अशा प्रकारे फायनली आमचा पुणे ते टोरोंटो हा सनसनाटी प्रवास संपन्न झाला. प्रसन्न आणि रोहन गाड्या घेऊन आलेच होते. एअरपोर्ट गेट ते कार हे अंतर स्वेटर, जॅकेट घालून सुद्धा कुडकुडत पार केले आणि एकदाचे घरी पोहोचलो. फ्लाईट डायव्हर्शन आणि बॅगा हरवणे हे, परत कधीही येऊ नयेत असे प्रकार, पहिल्यांदाच आणि एकाच प्रवासात अनुभवले.
संस्मरणीय प्रवास!
ReplyDeleteछान शब्दांकन!
मुकुंद आणि रोहिणी
खरोखरच सनसनाटी व लक्षात रहाण्यासारखा प्रवास ! बॅगा त्याच दिवशी घरी आल्या हे नशीब . काही लोकाचा असा अनुभव आहे की बॅगा चार दिवसांनी घरी आल्या .
ReplyDeleteहो ना. मिळेपर्यंत टेन्शनच होते
DeleteExcellent enjoyed reading
ReplyDelete