आज सकाळी सकाळी बिचारीला लवकर उठवले. तिचे आवरून, दूध पाजून, तिची बॅग तपासून तिचे आई बाबा तयार झाले. आजीने दृष्ट लागू नये म्हणून तिटाचा एक ठिपका नातीच्या गालाच्या मागे लावला. अजून तिला बोलता पण येत नाही, त्यामुळे तिला आपण काय बोलतो हे कळते की नाही हे समजायला काहीच मार्ग नाही. पण तरीही शाळेत रडू नको, नीट खेळ वगैरे चार उपदेशाच्या गोष्टी विनाकारण सांगून झाल्या. पहिला दिवस म्हणून आम्ही कौतुकाने तिला टाटा बाय बाय केले, ती पण भूर्र जायला मिळते असे वाटून आनंदाने तयार झाली, आणि आई बाबांबरोबर शाळेसाठी निघाली.
शाळेत पोचल्यावर तिथले वातावरण एकदम वेगळे होते. नेहमी मुलांचा कलकलाट चालू असतो, तर आज सगळ्या खोल्या आतून बंद होत्या. येणाऱ्या प्रत्येक मुलाचा ताप तपासून, सर्दी पडसे वगैरे काही नाही ना हे बघून आत घेतले जात होते. एझलचा पहिला दिवस होता म्हणून तिला घेऊन तिचे आई बाबा शाळाप्रमुखांकडे गेले. दार ठकठक केल्यावर आधी आतून विचारणा झाली की तुम्हाला कोणाला सर्दी पडसे नाही ना, किंवा कोरोनाची काही लक्षणे नाहीत ना. (लक्षणे असून देखील आपल्या मुलाला कोणी सोडायला येईल असे ह्यांना वाटलेच कसे हा प्रश्न वेगळा). नाही म्हटल्यावर दार उघडले आणि ह्यांना आत घेतले.
हाय हॅलो झाल्यावर प्रमुखांनी सांगितले की आजच खाजगी शाळा सुद्धा बंद ठेवण्याचा राज्याच्या पंतप्रधानांचा आदेश येणार आहे. तुम्ही आपल्या मुलीला इथे ठेवलेत तरी थोड्याच वेळात तिला घरी घेऊन जायला तुम्हाला परत यावे लागेल. त्यापेक्षा तुम्ही तिला आत्ताच घेऊन गेलात तर जास्त सोयीस्कर ठरेल. नशीब एझलला अजून काही कळत नाही, त्यामुळे ती हिरमुसली किंवा आनंदली वगैरे प्रकार झाला नाही, पण आई बाबांना मात्र थोडे वाईट वाटले. अर्थात शाळेत नेताना एक प्रकारची धाकधूक होतीच की तिथे काही इन्फेक्शन वगैरे होणार नाही ना, त्यातून सुटका झाली. आणि जगातील कुठल्याही मुलाचा झाला नसेल असा आमच्या एझलचा शाळेचा पहिला दिवस पार पडला. आता हे कोरोना प्रकरण आवाक्यात येईपर्यंत बिचारीची शाळा घरीच.
गो अवे कोरोना गो अवे...
अरे व्वा..पहिला दिवस खूपच छान शब्दबद्ध केला आहेत.
ReplyDeleteThank you 😊👍
ReplyDelete