Pages

Saturday, October 24, 2020

टोरोंटो ते पुणे - कोरोना वातावरणातील एक अनोखा प्रवास

प्रवास कसा प्लॅन्ड असावा हे माझ्या दोन्ही मुलांकडून शिकावे. प्रसन्नने आमच्या वयाला सुटसुटीत होईल, ले-ओव्हर वेळ जास्त नाही, कमी नाही, बॅगा आणि इमिग्रेशन सुरळीत होईल, लवकर बुक केले तर रेट पण जास्त नसतील, ह्या आणि अशा इतर सर्वाचा विचार करून ब्रिटिश एअरवेज ची मुंबई-हिथ्रो-टोरोंटो, आणि ह्याच मार्गाने, म्हणजे टोरोंटो-हिथ्रो-मुंबई,परत अशी तिकिटे काढली. माझ्या आधीच्या लेखात ( लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ) लिहिल्याप्रमाणे आमचा कॅनडात नाट्यपूर्ण  प्रवेश झाला. आता परत मात्र निवांतपणे जायला मिळावे असे वाटत असतानाच कोरोनाने सगळ्यांचे प्लॅन्स धुळीत मिळवले. पहिले १० मेचे, आणि मग ३१ जुलैचे, अशी दोन्हीही तिकिटे रद्द करावी लागली. दरम्यान एझल, प्रसन्न, सुजाता आणि दीपाली ह्या सगळ्यांचे वाढदिवस झाले. ज्यावेळी दुसरे तिकीट रद्द झाले तेंव्हा प्रसन्न म्हणाला, बाबा आता तुमचा पण वाढदिवस इथेच करू आणि मग तुमच्या परतीच्या तिकिटाचे बघू. पण दोन वेळा तिकिटे रद्द झाली होती, आता मिळेल ते तिकीट काढ, वाढदिवसाचे काय दरवर्षी येतो, असे सांगून १ ऑक्टोबरचे ब्रिटिश एअरवेजचे जे मिळाले ते तिकीट काढले. मधून मधून मी बघत होतो की हिथ्रो ते मुंबई  ब्रिटिश एअरवेजचे विमान मुंबईला उतरत आहे. टोरोंटो ते हिथ्रो विमानसेवा पण सुरू होती. परंतू एक धाकधूक होतीच, टोरोंटो ते  हिथ्रो ही आमची कनेक्टींग फ्लाईट १ ऑक्टोबर पासूनच सुरू होणार होती. तिला जर हिरवा कंदील नाही मिळाला तर? आणि शेवटी तसेच झाले, ईजा, बीजा, तीजा, ब्रिटिश एअरवेजचा प्रवास रद्द झाल्याचा ईमेल आला. ह्या कॅन्सलेशनचा आता वैताग आला होता. प्रसन्न बिचारा ऑफिसचे काम आणि आमचे बुकिंग ह्यात हैराण झाला होता, पण तो ते दाखवत नव्हता. शेवटी वंदे भारत शिवाय पर्याय नाही हे लक्षात आले, कारण ह्या फ्लाईट रद्द झाल्या असे कधी झाले नव्हते. लवकरात लवकर जे मिळेल ते तिकीट काढण्याचे ठरले. २९ तारखेची तिकिटे शिल्लक आहेत असे समजले. एअर इंडियाला फोन करून लगेज आणि ईमिग्रेशन मुंबईलाच होईल हे नक्की करून घेतले. आणि प्रसन्न दीपालीच्या ५ ऑक्टोबरनंतर तिकिटे काढण्याचा आग्रह त्यांना सद्यस्थितीत बाजूला ठेवायला सांगून प्रसन्नला मिळतंय ते तिकीट काढायला सांगितले.

एअर इंडियाची तिकिटे काढून झाल्यावर आता पुढे भारतातील क्वारंटाईनचे नियम, प्रवासातील सुविधा सोयी ह्याचा अभ्यास सुरू झाला. कोव्हिड टेस्ट करून गेलो तर सर्व चौदा दिवस होम क्वारंटाईन करायल  मिळणार होते. त्यासाठी टेस्टिंग सेंटर्सकडे चौकशी करता रिपोर्ट वेळेवर मिळतील ह्याची कोणी खात्री देईना. मग सात दिवस पुण्याच्याच हॉटेल मध्ये राहून सात दिवस घरी क्वारंटाईन पिरियड संपवायचे ठरले. त्याप्रमाणे प्राइड हॉटेलचे बुकिंग पण केले. नंतर कॉन्स्युलेट ऑफिसचा फॉर्म, सेल्फ हेल्थ रिपोर्ट वगैरे फॉर्म भरले. प्रसन्न-दीपालीने, घरी गेल्यागेल्या काही मिळाले नाही तर असू द्या, म्हणून रेडी टू ईट पॅकेट्स, दुधाची पावडर, चहा, कॉफी, बिस्किटे वगैरे सगळे आणून ठेवले. बॅगा भरून, त्याची वजने करून प्रवासाची सर्व जय्यत तयारी झाली. पण जोपर्यंत विमानात बसत नाही, तोपर्यंत आम्ही कॅनडाहून निघालो असे म्हणायला धजावत नव्हतो. आणि निघायचा दिवस उजाडला. एझलला दोन दिवस सर्दी होती, आणि बाहेर हवा पण थंड होती, त्यामुळे दीपाली आणि एझलने घराच्या दारातूनच टाटा केले आणि प्रसन्न आम्हाला घेऊन निघाला. मोठ्या सुनबाईंचे आदेश होते, ग्लोव्हज आणि मास्क घेऊनच एअरपोर्टला जा. विमानतळावर आणि विमानात काय काय खबरदारी घ्यायची ह्याची, तिच्या अनुभवाप्रमाणे इत्यंभूत माहिती दिली. त्याप्रमाणे सर्व सेफ्टीच्या गोष्टी बरोबर घेतल्या. कॅनडामधील आमचा शेवटचा मनोहर सूर्योदय बघत बघत आम्ही एअरपोर्टला पोचलो.

एझल आणि दीपालीचा निरोप घेताना 

कॅनडा मधील आमचा शेवटचा सूर्योदय


एरवी प्रवाश्यांबरोबर त्यांना निरोप द्यायला येणाऱ्यांना पण प्रवेश देतात. पण प्रसन्नची एक सहकारी स्नेहा, तिच्या आईला निरोप देण्यासाठी आली होती तिला दारातच थांबवले. ते सगळे आमची वाट पाहत थांबले होते. आम्ही आधीच चौकशी करून ठेवली होती त्याप्रमाणे प्रसन्नने तेथील सिक्युरिटी ऑफिसरला विनंती केली की आईबाबा सिनियर सिटिझन आहेत, फक्त बॅगा काउंटरपर्यंत नेऊन देऊन लगेच परत येतो. त्या ऑफिसरने आमच्याकडे पाहिले, आणि फक्त एकालाच बरोबर यायची परवानगी दिली. प्रसन्न आणि स्नेहाचे यजमान दोघेच जण आम्हाला सोडायला आत आले. काउंटरवर बऱ्यापैकी लाईन होती. पण सर्वजण शिस्तीत, योग्य अंतर ठेवून उभे होते. सगळ्यांचे थर्मल चेकिंग झाले, आणि पासपोर्ट वर तसा स्टिकर लावला. बॅगा व्यवस्थित चेक इन झाल्या, आणि प्रसन्नला बाय बाय करून आम्ही कस्टमसाठी आत गेलो. मागील प्रवासांच्या अनुभवावरून आम्ही एअरपोर्टवर व्हील चेअर घेणे पसंत केले होते. चालत जायला काही वाटत नाही, पण रांगेत उभे राहिले की गुडघे दुखायला लागतात. ह्या व्हील चेअरमुळे आम्हाला खूप फायदा झाला. कुठेही रांगेत उभे न राहता, दहा मिनिटात आम्ही इमिग्रेशन पास करून पलीकडे गेलो. पुढे त्यांच्याच कार्टने गेट पर्यंत पोचलो. आमचे एक स्नेही नुकतेच ह्या एअरपोर्ट वरून अमेरिकेला गेले होते. त्यांना एअरपोर्ट वर पाणी सोडून काहीही मिळाले नव्हते. त्यामुळे समोर हॉटेल चालू आहे हे बघून काय आनंद झाला. गरम गरम कॉफी घेत आम्ही विमान सुटायची वाट बघत बसलो.


टोरोंटो विमानतळावर बोर्डिंग पाससाठी रांग


टोरोंटो विमानतळावरील कॅफे

एकदाचा विमानात प्रवेश झाला आणि नक्की झाले की आता आपण पुण्याला पोचणार. सीटवर मास्क, शिल्ड आणि फूड पॅकेट ठेवले होते. आम्ही लवकर आत गेल्यामुळे वरच्या कप्प्यात बॅगा ठेवायला आरामात जागा मिळाली. पण हळू हळू सर्व जागा भरल्या, आणि शेवटी आलेल्यांना एक बॅग इकडे, दुसरी बॅग तिकडे अशा ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या. सुजाताचे मधले सीट होते म्हणून तिला एक सफेत कोट घालायला ठेवला होता. कॅनडा मध्ये दुपार होती, पण भारतात रात्र होती म्हणून असेल, विमान सुरू झाल्याबरोबर सर्व खिडक्या बंद करायला सांगितले, आणि दिवे बंद करून विमानात रात्र सुरू केली गेली. समोरच्या करमणुकीच्या स्क्रीनवर सिनेमा नाही, गेम्स नाहीत, ट्रॅकिंग नाही, तो फक्त एअरलाइन्सच्या सुचनांपुरताच उपलब्ध होता. गपचुप बसून पूर्ण प्रवास करावा लागणार होता. नशीब शेजारी एक मुलगी स्वतःच्या लग्नासाठी निघाली होती, तिच्याशी थोड्या गप्पा मारत वेळ गेला. मधूनच स्नॅक्स खाणे चालू होते. मधूनच डुलकी मारणे सुरु होते. थोड्या वेळाने कॉफीचा वास आला, डोळे उघडून बघतो तर एक प्रवासी कॉफीचे दोन कप घेऊन चालला होता. सुजाता जागीच होती. तिला विचारले, कॉफी मिळाली तर घेणार का. होकार अपेक्षितच होता. पाठीमागे गेलो. तिथल्या केबिन क्रूला विचारले की कॉफी मिळेल का, दोन मिनिटात मस्त गरम गरम कॉफी घेऊन सिटवर परतलो. सीट वर ठेवलेल्या फूड पॅकेट व्यतिरिक्त काही मिळेल अशी अपेक्षाच नव्हती, त्यामुळे ही गरम कॉफी मिळाली म्हणून एकदम खुश झालो. काही तासांनी भूक लागायला लागली. पण कॉफी मिळाली तसे कदाचित जेवण सुद्धा मिळेल ह्या अपेक्षेने बराच वेळ वाट बघत बसलो. शेवटी दीपालीने दिलेल्या पालक पुऱ्या काढल्या आणि जेवण करून घेतले. आणि आता झोपावे म्हणून तयारी करू लागलो तर काय, समोरून फूड पॅकेट वाटपाची ट्रॉली आली. पोट तर बऱ्यापैकी भरले होते, तरी पण पॅकेट उघडून जेवायला सुरुवात केली. आणि एक अनपेक्षित धक्का बसला. चिकन राईस आणि पराठा एकदम गरम गरम आणि चवीष्ट होते. बरोबर कोक पण दिला होता. खरे तर विमानात पाणी सोडून काहीही मिळणार नाही ह्या अपेक्षेने आम्ही बसलो होतो, त्यामुळे हे सर्व मिळणे म्हणजे एक सुखद धक्का होता. व्वा, मस्त ढेकर येईपर्यंत जेवलो. काही वेळाने शेवटची अनाउन्समेंट झाली, आणि फायनली विमान दिल्ली विमानतळावर उतरले. आमचा भारतात प्रवेश झाला.

विमानात पूर्ण सुरक्षा कवच

दिल्लीला विमानातून बाहेर पडलो तो व्हील चेअर घेऊन तिथली मुले वाटच बघत उभी होती. आमचे नाव विचारून, परत एकदा कुठेही रांगेत उभे न राहता त्यांनी गेटवर आणून सोडले. सीसीडी मधून कॉफी घेतली आणि पुढच्या मुंबईच्या विमानाची वाट पहात बसलो. दिल्लीला उतरल्यावर फोन सुरू झाला. लगेच आरोग्य सेतू ऍप चालू केले. पुष्करने ठाण्यावरून पैसे भरून सुद्धा सुजाताचा फोन चालू होत नव्हता. एअरपोर्टचे वायफाय पण बंद होते. मग माझ्या मोबाईल वरून हॉटस्पॉट घेऊन तिचा पण आरोग्य सेतू ऍप सुरू केला. बरोबर वेळेवर विमानाने मुंबई साठी उड्डाण केले. विमानात अगदी तीस बत्तीस प्रवासी असतील, सगळे परदेशातून आलेले. एवढे रिकामे विमान कधीच बघितले नव्हते. परदेशातून घरी परतणाऱ्या प्रवाश्यांची भारत सरकारने खूप छान काळजी घेतली होती. अन्यथा एवढ्याच प्रवाशांसाठी रिकामे विमान कोण सोडणार. विमानात गेल्यावर एअर होस्टेसने विचारले, वेळ आली तर इमर्जन्सीत दरवाजा ओपन करायची माहिती देऊ का, तुम्ही दरवाजा जवळ बसू शकता. मग काय तिच्या सूचना ऐकल्या आणि आम्ही दोघे दरवाजा जवळच्या सीट वर येऊन बसलो. तीनच्या सीट वर दोघे, परत समोर ऐसपैस पाय पसरायला भरपूर जागा. आरामात मुंबईला पोचलो. तिथे परत व्हील चेअरवाल्या मुलांनी फटाफट इमिग्रेशन करून घेतले, आमच्या बॅगा घेतल्या, कस्टम चेक मधून पास करून घेतल्या, आमचे आरोग्य सेतू ऍप ग्रीन स्टेटसवर आणून तो मोबाईल स्क्रीन तिथल्या चेक पॉइंट वर दाखवला, हेल्थ चेक पॉइंट जवळ आमचा फॉर्म भरून दिला आणि आम्हाला बाहेर टॅक्सी पर्यंत आणून सोडले. ह्या मराठी मुलांनी खूपच निःस्वार्थी मदत केली. दिल्लीच्या मुलांना शंभर शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले तरी त्यांची तोंडे वाकडीच होती. पण ह्या मुंबईच्या मुलांनी स्वतःहून पैसे तर मागितले नाहीतच, पण जे दिले त्यात ते पूर्ण समाधानी होते. बाहेर आमचे मित्र प्रवीण सरकाळे स्वतः त्यांची टॅक्सी घेऊन वाट पहात होते. त्यांच्याशी गप्पा मारत मारत पुणे मुक्कामी हॉटेल प्राइडला सात दिवसांच्या क्वारंटाईन साठी पोचलो.

हॉटेलमध्ये मात्र एका दिवसात कंटाळा आला. एक आठवडा बाहेर पडायला निर्बंध, खोली मोठी असली तरी खोलीतल्या खोलीत किती फिरणार ना. एरवी आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा मस्त वाटते, कारण दिवसभर बाहेर भटकून आलेले असतो. इथे सगळीच पंचाईत.अजून सहा दिवस कसे काढायचे ह्याची चिंता वाटू  लागली. सकाळी वेटरने ब्रेकफास्टसाठी  बेल मारली की उठायचे, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन, (वाटल्यास) आंघोळ करून, टीव्ही आणि मोबाईलशी खेळत बसायचे, परत जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण करून झोपायचे एवढाच काय तो उद्योग. रोज दोन्ही मुलांचे आणि सुनांचे फोन येत होते. आई बाबा काळजी घ्या, इथे कॅनडा सारखे वातावरण नाहीये, मास्क लावून दार उघडा वगैरे सूचना यायच्या. एझल आणि रुहीची खबरबात मिळायची. पण ते सगळे आपापल्या उद्योगात, त्यांच्याशी तरी किती वेळ बोलणार. दहा किलोमीटरवर घर, पण हॉटेल मध्ये दिवस ढकलत होतो. पाच तारखेला सकाळी प्रसन्न आणि दीपालीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल आला. आता दोनच दिवस राहिलेत, परवा घरी पोचू, एझल आठवण काढते पण आता नॉर्मल व्हायला लागली आहे वगैरे गप्पा झाल्या. ह्या दोघांचा कॉल संपताच पुष्कर अमृताचा व्हिडिओ कॉल आला. त्यांच्या बरोबर बोलत होतो तेव्हाच ब्रेकफास्ट घेऊन येणाऱ्या वेटरने बेल मारली. आज उपासाचा ब्रेकफास्ट काय आहे बघण्यासाठी सुजाताने दार उघडून बघितले तर काय, वेटर केक आणि ग्रिटींग कार्ड घेऊन उभे होते. अरेच्चा, ह्यांना कसे कळले माझा वाढदिवस आहे ते? नंतर कळले की ही सगळी अमृताची करामत. आदल्या रात्रीच तिने फोन करून केक आणि ग्रिटींग कार्डची व्यवस्था करून ठेवली होती. ग्रिटींग कार्ड बाहेरून आणणे शक्य झाले नाही म्हणून हॉटेलच्या रोशनी नावाच्या रिसेप्शनिस्टने हाताने ते तयार केले. जबरदस्त सरप्राईज होते. केक रूमवर आणताना बहुधा हॉटेलमधून अमृताला फोन गेला असावा, कारण तिचा फोन आणि वेटर्सचे येणे एकत्र कसे झाले. सुजाता, पुष्कर, अमृता, अमृताची आई, आणि हॉटेलचे तीन वेटर ह्यांच्या समोर (दाढी नाही, आंघोळ नाही, नुकताच उठलो होतो) केक कापला आणि अनपेक्षितपणे माझा वाढदिवस (होय, थाटामाटातच) साजरा झाला. संकष्टी चतुर्थी होती, म्हणून केक नुसताच कापला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला. पण एकंदरीत मजा आली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील.


वाढदिवसा चा सुंदर केक

सुंदर ग्रिटींग कार्ड


आणि फायनली, हॉटेल मधील मुक्काम हलवून, आठ जानेवारीला घर सोडले होते ते बरोबर नऊ महिन्यांनी, सात ऑक्टोबरला स्वगृही सुखरूप पोचलो.




Friday, October 16, 2020

माझा क्वारंटाईन बर्थडे

कॅनडा मधील वास्तव्यात एझल, प्रसन्न, सुजाता आणि दीपाली ह्या सगळ्यांचे वाढदिवस झाले. ज्यावेळी आमचे भारतात परतण्याचे दुसरे तिकीट सुद्धा कॅन्सल झाले, तेव्हा प्रसन्न म्हणाला, बाबा आता हे तिकिटाचे राहू द्या, तुमचा वाढदिवस इथेच करू आणि त्यानंतर तिकिटाचे बघू. पण दोन वेळा तिकिटे रद्द झाली होती, म्हणून आता मिळेल ते तिकीट काढ, वाढदिवसाचे काय, दरवर्षी येतो, असे सांगून त्याला तिकीट काढायला सांगितले. शेवटी वंदे भारत मिशन मध्ये तिकीट मिळाले, आणि एअर इंडियाच्या कृपेने पुणे मुक्कामी हॉटेल प्राइडला सात दिवसांच्या क्वारंटाईनसाठी सुखरूप पोचलो.

हॉटेलमध्ये एका दिवसात कंटाळा आला. एक आठवडा बाहेर पडायला निर्बंध, खोली मोठी असली तरी खोलीतल्या खोलीत किती फिरणार ना. एरवी आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा मस्त वाटते, कारण दिवसभर बाहेर भटकून आलेले असतो. इथे सगळीच पंचाईत.अजून सहा दिवस कसे काढायचे ह्याची चिंता वाटू  लागली. सकाळी वेटरने ब्रेकफास्टसाठी  बेल मारली की उठायचे, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन, (वाटल्यास) आंघोळ करून, टीव्ही आणि मोबाईलशी खेळत बसायचे, परत जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण करून झोपायचे एवढाच काय तो उद्योग. रोज दोन्ही मुलांचे आणि सुनांचे फोन येत होते. आई बाबा काळजी घ्या, इथे कॅनडा सारखे वातावरण नाहीये, मास्क लावून दार उघडा वगैरे सूचना यायच्या. एझल आणि रुहीची खबरबात मिळायची. पण ते सगळे आपापल्या उद्योगात, त्यांच्याशी तरी किती वेळ बोलणार. दहा किलोमीटरवर घर, पण हॉटेल मध्ये दिवस ढकलत होतो.

पाच तारखेला सकाळी प्रसन्न आणि दीपालीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल आला. आता दोनच दिवस राहिलेत, परवा घरी पोचू, एझल आठवण काढते पण आता नॉर्मल व्हायला लागली आहे वगैरे गप्पा झाल्या. ह्या दोघांचा कॉल संपताच पुष्कर अमृताचा व्हिडिओ कॉल आला. त्यांच्या बरोबर बोलत होतो तेव्हाच ब्रेकफास्ट घेऊन येणाऱ्या वेटरने बेल मारली. आज उपासाचा ब्रेकफास्ट काय आहे बघण्यासाठी सुजाताने दार उघडून बघितले तर काय, वेटर केक आणि ग्रिटींग कार्ड घेऊन उभे होते. अरेच्चा, ह्यांना कसे कळले माझा वाढदिवस आहे ते? नंतर कळले की ही सगळी अमृताची करामत. आदल्या रात्रीच तिने फोन करून केक आणि ग्रिटींग कार्डची व्यवस्था करून ठेवली होती. ग्रिटींग कार्ड बाहेरून आणणे शक्य झाले नाही म्हणून हॉटेलच्या रोशनी नावाच्या रिसेप्शनिस्टने हाताने ते तयार केले. जबरदस्त सरप्राईज होते. केक रूमवर आणताना बहुधा हॉटेलमधून अमृताला फोन गेला असावा, कारण तिचा फोन आणि वेटर्सचे येणे एकत्र कसे झाले. सुजाता, पुष्कर, अमृता, अमृताची आई, आणि हॉटेलचे तीन वेटर ह्यांच्या समोर (दाढी नाही, आंघोळ नाही, नुकताच उठलो होतो) केक कापला आणि अनपेक्षितपणे माझा वाढदिवस (होय, थाटामाटातच) साजरा झाला. संकष्टी चतुर्थी होती, म्हणून केक नुसताच कापला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला. पण एकंदरीत मजा आली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील.