कॅनडा मधील वास्तव्यात एझल, प्रसन्न, सुजाता आणि दीपाली ह्या सगळ्यांचे वाढदिवस झाले. ज्यावेळी आमचे भारतात परतण्याचे दुसरे तिकीट सुद्धा कॅन्सल झाले, तेव्हा प्रसन्न म्हणाला, बाबा आता हे तिकिटाचे राहू द्या, तुमचा वाढदिवस इथेच करू आणि त्यानंतर तिकिटाचे बघू. पण दोन वेळा तिकिटे रद्द झाली होती, म्हणून आता मिळेल ते तिकीट काढ, वाढदिवसाचे काय, दरवर्षी येतो, असे सांगून त्याला तिकीट काढायला सांगितले. शेवटी वंदे भारत मिशन मध्ये तिकीट मिळाले, आणि एअर इंडियाच्या कृपेने पुणे मुक्कामी हॉटेल प्राइडला सात दिवसांच्या क्वारंटाईनसाठी सुखरूप पोचलो.
हॉटेलमध्ये एका दिवसात कंटाळा आला. एक आठवडा बाहेर पडायला निर्बंध, खोली मोठी असली तरी खोलीतल्या खोलीत किती फिरणार ना. एरवी आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा मस्त वाटते, कारण दिवसभर बाहेर भटकून आलेले असतो. इथे सगळीच पंचाईत.अजून सहा दिवस कसे काढायचे ह्याची चिंता वाटू लागली. सकाळी वेटरने ब्रेकफास्टसाठी बेल मारली की उठायचे, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन, (वाटल्यास) आंघोळ करून, टीव्ही आणि मोबाईलशी खेळत बसायचे, परत जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण करून झोपायचे एवढाच काय तो उद्योग. रोज दोन्ही मुलांचे आणि सुनांचे फोन येत होते. आई बाबा काळजी घ्या, इथे कॅनडा सारखे वातावरण नाहीये, मास्क लावून दार उघडा वगैरे सूचना यायच्या. एझल आणि रुहीची खबरबात मिळायची. पण ते सगळे आपापल्या उद्योगात, त्यांच्याशी तरी किती वेळ बोलणार. दहा किलोमीटरवर घर, पण हॉटेल मध्ये दिवस ढकलत होतो.
पाच तारखेला सकाळी प्रसन्न आणि दीपालीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल आला. आता दोनच दिवस राहिलेत, परवा घरी पोचू, एझल आठवण काढते पण आता नॉर्मल व्हायला लागली आहे वगैरे गप्पा झाल्या. ह्या दोघांचा कॉल संपताच पुष्कर अमृताचा व्हिडिओ कॉल आला. त्यांच्या बरोबर बोलत होतो तेव्हाच ब्रेकफास्ट घेऊन येणाऱ्या वेटरने बेल मारली. आज उपासाचा ब्रेकफास्ट काय आहे बघण्यासाठी सुजाताने दार उघडून बघितले तर काय, वेटर केक आणि ग्रिटींग कार्ड घेऊन उभे होते. अरेच्चा, ह्यांना कसे कळले माझा वाढदिवस आहे ते? नंतर कळले की ही सगळी अमृताची करामत. आदल्या रात्रीच तिने फोन करून केक आणि ग्रिटींग कार्डची व्यवस्था करून ठेवली होती. ग्रिटींग कार्ड बाहेरून आणणे शक्य झाले नाही म्हणून हॉटेलच्या रोशनी नावाच्या रिसेप्शनिस्टने हाताने ते तयार केले. जबरदस्त सरप्राईज होते. केक रूमवर आणताना बहुधा हॉटेलमधून अमृताला फोन गेला असावा, कारण तिचा फोन आणि वेटर्सचे येणे एकत्र कसे झाले. सुजाता, पुष्कर, अमृता, अमृताची आई, आणि हॉटेलचे तीन वेटर ह्यांच्या समोर (दाढी नाही, आंघोळ नाही, नुकताच उठलो होतो) केक कापला आणि अनपेक्षितपणे माझा वाढदिवस (होय, थाटामाटातच) साजरा झाला. संकष्टी चतुर्थी होती, म्हणून केक नुसताच कापला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला. पण एकंदरीत मजा आली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील.
No comments:
Post a Comment