२३ ऑगस्ट २०२०. आज आई ८६ वर्षांची झाली असती. पण दोन महिने आधीच, २४ जूनला, तिने आमचा कायमचा निरोप घेतला. दुर्दैव माझे की ह्या कोरोनामुळे मी तिच्या कोणत्याही अंत्यक्रियांसाठी उपस्थित राहू शकलो नाही. तिच्या स्मृतींना वंदन करून तिच्या आणि तिच्या आईबाबांच्या स्वातंत्र्य संग्रामातील काही आठवणींना उजाळा देत आहे.
(ह्या लेखातील ग काका आणि ग काकी, उर्फ गंगाधर चिटणीस आणि मनोरमा चिटणीस हे माझे आजोबा आणि आजी. आणि कमल उर्फ बेबी ही माझी आई).
ही कथा आहे काळाच्या आड गेलेल्या एका अज्ञात भूमिगत क्रांतिकारकाची आणि त्याच्या कुटुंबाची, सातारा (आता सांगली) जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील, चिखलगोठण ह्या क्रांतिकारी गावातील गंगाधर चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबाची.
गंगाधर चिटणीस यांना गावात लोक आदराने ग काका असे म्हणत. ग काका हे गावचे इनामदार होते. ग काका यांच्या पत्नी मनोरमा गंगाधर चिटणीस यांना गावात सगळे ग काकी असे म्हणत. ग काका गावचे इनामदार असल्याने पोलिसांची मर्जी सांभाळून सगळ्या क्रांतीकारकांना मदत करत होते. पोलिसांना कधीच त्यांच्या वर शंका आली नाही. त्यांना वाटे की हे आपल्या बाजूने आहेत पण प्रत्यक्षात ते क्रांतिकारांना मदत करत होते हे कोणालाही माहिती नसे. ग काकांचे मुख्य काम भूमीगतांच्या जखमींना सांभाळणे, जखमी होऊन तुरुंगात गेलेल्यांचे खटले चालविण्यासाठी सर्व व्यवस्था करणे, त्यांच्या घरादाराकडे लक्ष ठेवून लागेल ती मदत करणे, फितूर साक्षीदारांना सरळ करण्यासाठी पत्री सरकारला सांगावा धाडणे, इत्यादी. त्यासाठी त्यांना कोल्हापूर ते खानदेश भिंगरीप्रमाणे फिरावे लागत असे. ग काकांनी भूमिगत कार्याच्या कामात धन दिले, मन दिले, आणि त्यांनी त्याचे घरही दिले. ग काकांच्या साऱ्या कुटुंबाने देशसेवेसाठी जणू वाहून घेतले होते. भूमिगत कार्याचे ते एक आधारस्तंभ होते.
ग काकी ह्या मातेने तर आपल्या देहाचा कण अन् कण भूमिगतांच्या सेवेत वेचला. ती भूमिगातांची आई बनली. एकेका वेळेला ५-५० भूमिगत रात्री बेरात्री कधीही येवोत, अर्ध्या रात्री उठून ह्या माऊलीने स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातले. तिच्या किरकोळ देहयष्टीत जणू हत्तीचे बळ संचारलेले असे. सदा उभी, सदा चूल पेटलेली, आळस नाही, उबग नाही, उसंत नाही. ग काकी यांना सगळे भूमिगत क्रांतीकरक आदराने भवानी माता असे पण म्हणत. त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलीच नाव कमल होते, तिला सगळे बेबी असे म्हणत. इंग्रज पोलिसांना संशय येऊ नये म्हणून स्वातंत्र लढ्याच्या कामात लहान बेबीचा पण ते सहभाग करून घेत.
ग काकांच्या वाड्यात क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी, डॉ. उत्तमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. लीलाताई पाटील, व्यंकटेश माडगुळकर, श्रीमती अरुणा असफअली यांसारखे अनेक क्रांतिकारक वास्तव्य करून गेले, पण ह्याची इंग्रजांना कधीही कल्पना आली नाही. ग काका हे नाना पाटील यांच्या पत्री सरकार मधील त्यांचे सहकारी पण होते. ग काका आधी पासून स्वातंत्र लढ्यात उतरले होते. सगळे क्रांतिकारक हक्काने आणि विश्वासाने चिखलगोठण येते लपायला येत असत. असेच करत करत ते नाना पाटील ह्यांच्या प्रती सरकार मध्ये सहभागी झाले. संपूर्ण गाव हे प्रती सरकार च्या भूमिगत क्रांतीकारकांना मदत करत असे. पण याची जराशीही कुणकुण पोलिसांना लागली नाही. एके दिवशी नाना पाटील यांच्या विरुद्ध वॉरंट निघाले. त्यांना अटक होणार म्हणून ते सातारा येथून निसटले. पण आता लपायचे कुठे हा विषय आला. त्यांचे एक साथीदार जी. डी. बापू लाड यांनी सुचवले, चिखलगोठण येथील गंगाधरपंत चिटणीस ह्यांच्या वाड्यात जाऊ. ते आपल्या चळवळी मधील आहेत, आणि त्यांचा वाडा आपल्यासाठी सुरक्षित आहे. म्हणून ते सुरवातीला २ ते ३ दिवसाठी ग काकांच्या वाड्यात येऊन लपले. आणि त्यानंतर हा वाडा त्यांचे हक्काचेच लपण्याचे ठिकाण झाले.
क्रांतिकारकांना पैशाची चणचण जाणवू लागली. नाना पाटील, त्यांचे सहकारी जी. डी. बापू लाड व नागनाथ अण्णा नायकवडी ह्यांनी इंग्रजांचा खजिना लुटायचा बेत ठरवला. या कटात ग काका पण सामील होते. मिरजेहून धुळ्याला एका ट्रेन मधून पगाराची रक्कम जाणार होती. ती ताकारी स्टेशन गेल्या नंतर लुटण्यात आली. ह्या लुटीची काही रक्कम ही चिखलगोठण येथे ग काकांच्या वाड्यात सुरक्षित ठेवायची ठरले. पेच असा पडला की तिथपर्यंत हा गठ्ठा न्यायचा कसा? त्यांनी ठरवले की लहानग्या बेबीला सोबत ठेवायचे आणि सामान तिच्या कडे द्यायचे, म्हणजे पोलिसांना संशय येणार नाही. त्यावेळेस बेबी इस्लामपूरला तिच्या आजोळी शिकायला पाठवली होती, कारण चिखलगोठण गावात तिचे शिक्षण नीट झाले नसते. ग काकांचे सासरे हे इस्लामपूरला सर्कल इन्स्पेक्टर होते. ते शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड कडक शिस्तीचे होते. ग काका तडक इस्लामपूर येथे गेले आणि सांगितले की बेबीच्या आईला बरे वाटत नाहीये, २/४ दिवसात तिला भेटवून परत आणतो. ग काकांचे सासरे बेबीला सोडायला तयार नव्हते, पण सासूबाईंनी तिला सोडले. तेव्हा सासरे प्रचंड चिडले आणि बोलले पोरीचं शिक्षण नीट होऊ द्या, आता सोडतो परत नंतर सोडणार नाही. २ दिवस येऊन नाही झाले तर आले लगेच घ्यायला. ग काकांनी बेबीची कपड्यांची पिशवी घेतली आणि निघाले. इस्लामपूर येथून बसमध्ये बसले आणि जिथे लुटीच सामान ठेवले तिथे गेले. ती लूट बेबीच्या पिशवी सोबत दिली आणि ते चालत स्टेशनवर पोचले. चालत येताना बेबीला सांगितले होते, पिशवीवर लक्ष ठेव, कोणाला हात लावून द्यायचा नाही, आणि तुझ्या सोबत कोण आहे विचारले तर कोणी नाही म्हणून सांगायचे. रेल्वे स्टेशन जवळच्या एका हॉटेलमध्ये ते जेवले आणि ट्रेन आली तशी तिला ट्रेनमध्ये बसवले. ट्रेनमध्ये आधीच तिच्या समोर एक धनगर, आणि बाजूला एका साधू बसले होते. तिला तिथे बसवले, सामान अर्धे सीटखाली आणि अर्धे वर ठेवले. तिला सांगितले बस इथे, कुठे जाऊ नको आणि तुला जे काही सांगितले आहे ते सगळे नीट लक्षात ठेव. बाजूच्या लोकांना सांगितले की मी जाऊन येतो, पोरीवर जरा लक्ष ठेवा. आणि ते गेले ते परत आलेच नाहीत. बेबीला खेळायला भरपूर घुंगरू असलेला एक पैंजण दिला होता. त्यात ती रमून गेली. ताकारी स्टेशन आलं तस तिला तिथे उतरवून घेतलं. आणि आडवाटेने पुढचा पायी प्रवास सुरू झाला. खाणाखुणा झाल्या की काही माणसं येत. थोड्या अंतरावर ती माणसे त्यांना एका ठिकाणी सोडायची आणि वेगवेगळया वाटेने निघून जायचे. गावातून न जाता आड वाटेने जात असत कारण पोलीस मागावर असत. बेबी चालून किंवा पळून दमली की तिला कोणीतरी उचलून घेत. अशी मजल दरमजल करत एकदाचं चिलखगोठण गाठलं. तसे वाड्यात सगळे क्रांतिकारक रात्री अपरात्री यायचे. म्हणून हे सगळे रात्री आले त्याचे कोणाला आश्चर्य वाटले नाही. सगळ्यांना ग काकीनी गरमागरम भाकरी व भाजी करून जेवायला दिले. बेबीला अजून एक लहान बहीण होती लीला. दोघी जणी गप्पा मारत बसल्या. बेबी गंमत जम्मत सांगत होती. आई बाबा ओरडतील म्हणून त्यांनी झोपेचे सोंग घेतले, तेव्हा ग काकी काकांना विचारत होत्या, बेबीला मध्येच कसे काय आणले? काकांनी सांगितले तो दरोडा टाकला ना त्याची रक्कम कशी आणायची असा पेच पडला, म्हणून बेबीला घेऊन आलो. तात्या सोडत नव्हते पण ताईनी सोडले (तात्या म्हणजे काकींचे वडील आणि ताई म्हणजे आई). आणि तुला जे सांभाळून ठेवायला दिले आहे ना हे तेच आहे बर का. काकींना हे ऐकून बहुतेक काळजी वाटली असावी. त्या म्हणाल्या अहो ही पिशवी कुणी चोरली असती किंवा पोलीस आले असते आणि तिला दोन फटके देऊन तिच्या तोंडून वदवून घेतलं असतं तर? परत कृपाकरून तिला असल्यात घेऊ नका. अहो लहान पोर ते. ग काका म्हणाले, अग ती एकटी नव्हती कडेला इश्वर, नाथा, व्यंकू मामा ही सगळी आपलीच मंडळी होती. फक्त वेगळ्या रुपात. अशा प्रकारे ती रक्कम व्यवस्थित जागेवर पोहोचली. ही सगळे आपलीच मंडळी होती हे जेंव्हा बेबीला समजले तेंव्हा तिला सांगून ठेवले की हे कुठेही बोलायचे नाही, नाहीतर पोलीस तुझ्या बाबांना पकडतील, आणि जेलमध्ये टाकून फटके देतील, चालेल तुला? मग काय ती गप.
बेबी इस्लामपूरला आजोळी शिकायला असताना त्यांच्या घराच्या मागेच पोस्ट ऑफिस होतं, आणि त्यासमोर एक मैदान होतं. एक दिवस तिथे बेबी आणि तिचा शरदमामा खेळत होते. शरदमामा फक्त चार वर्षांनी मोठा. पोस्टासमोर एकजण नुसता रेंगाळत उभा होता. बेबी मामाला म्हणाली, अरे अजून ते काका बघ तिथेच बोलत थांबलेत. तो म्हणाला ते तुला नाही कळायचं. पुढे तो काहीच बोलला नाही, पण तो घाबरला होता. तिला कळेना तो का घाबरला? तसे तिथे घाबरण्याजोगे काहीच नव्हते. तेवढयात मोठा स्फोट झाला आणि ते काका आख्खे पेटले. मामा बेबीला घेऊन घरात पळत आला आणि आईशी काहीतरी बोलला. नंतर बेबी जेव्हा सुट्टीत गावी आली, तेव्हा तिने आईबाबांचं बोलणं ऐकलं. त्याच नाव शांताराम शिवराम अस काहीतरी होतं, तो पोस्टावर बॉंब टाकायला गेला होता आणि तिथला पोलीस हालेपर्यंत थांबला होता. त्याच्याकडे टाईम बॉंब होता, तो त्याच्या खिश्यातच फुटला आणि भाजला. बरं झालं तिथ इश्वरी होता, त्याने कुठूनतरी घोंगडी आणली आणि त्याला गुंडाळलं. खूप भाजला होता, पण औषध केलं, मलम लावलं.
इस्लामपूरला शाहीर निकम आले की मुलांना पोवाडे म्हणून दाखवायचे. ते जेंव्हा बेबीच्या आजोबांनी ऐकलं तेंव्हा ग काकांच्या अपरोक्ष त्यांनी बोलायला सुरवात केली, असले पोवाडे म्हणायचे असतील तर माझ्या घरी चालायचे नाही. तेव्हापासून शाहीर निकम आले की बेबी आणि शरदमामा त्यांच्या सोबत पत्र्यावर जाऊन पोवाडे ऐकत आणि गात बसायचे. पोवाडा म्हणायला हे दोघे पण शिकले. जीजाने पण (उत्तमराव पाटील यांची बहिण) “हे हरामखोर सरकार नाही जिंवत आम्ही ठेवणार” अशा प्रकारची गाणी, आणि “खानदेशी गाव टुमदार नाव, नंदुरबार येथे सुकुमार सोळा वर्षाचा होता एक बाळ, शिरीष नावाचा लडीवाळ, परी गोऱ्यांना भासला काळ, जी s s s जी s s” ह्या प्रकारचे पोवाडे शिकवलेले होते. २/३ वेळा कुंडल, पलूस किंवा असे कुठे शाहिरांचे कार्यक्रम असले, आणि पोलिसांना बातमी लागली की शाहिरांना अर्ध्या कार्यक्रमा मधून चहाला म्हणून बाहेर नेत असत. आणि ते येईपर्यंत ह्या मुलांना गाणी, पोवाडे म्हणायला सांगत. पोलीस आले की रागारागाने बघत. पण लहान मुलांना काही करता यायचं नाही. म्हणायचे परत असली गाणी म्हणालात तर पकडून नेऊ, तिला पण नेऊ. शाहीर निकम काही परत यायचे नाहीत. त्यांना बहुतेक पळवून नेलेल असायचं.
एकदा गावात प्लेगची साथ आली होती म्हणून संपूर्ण चिटणीस कुटुंब आणि गावातील लोक आपापल्या शेतात राहायला गेले होते. तेव्हा उत्तमराव पाटील आणि त्यांचे काही सहकारी पण तिथेच होते. तेवड्यात बहिर्जी नाईक (प्रती सरकार मधील एक तुकडी) पथकातील एक खबरी आला आणि त्यांने निरोप दिला, आज रात्री नाना पाटील येणार आहेत, त्यांना लपवायचे आहे. निरोप सांगून तो निघून गेला. आता मोठी पंचाईत, २/३ दिवसात पोलीस पार्टी येणार, लपवायचे कुठे असा प्रश्न पडला. गावात तर प्लेगची साथ आहे मग? मग ग काकांनी जोखीम घेतली आणि वाड्याच्या एका अडगळीच्या खोलीत त्यांना ठेवले. आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून बाहेरचे सगळे दरवाजे उघडे ठेवले. बरोबर ३/४ दिवसांनी पोलीस पार्टी आली तेव्हा संपूर्ण गाव रिकामे होते. गावात कोणीच नाही बघून ते ग काकांच्या वाड्यावर आले. दरवाजे सताड उघडे होते. पोलिसांनी वाड्यात प्रवेश केला, सगळा वाडा फिरून बघितले, कोणीच दिसले नाही. थेट ते माजघरापर्यंत गेले पण कोणीच दिसले नाही. शेवटी उलट पावली परत गेले. माजघराच्या जवळच एक अडगळीची खोली होती, ती खोली फक्त त्यांनी बघितली नाही. नाहीतर नाना नक्की पकडले गेले असते. ग काका काकी रोज लपतछपत वाड्यात येवून नाना पाटील ह्यांना जेवण देत असत.
एकदा ग काका व काकीची जेवणे झाली होती आणि ते झोपायला जात होते, तेवढयात दारावर थाप पडली. काकींनी दार उघडले आणि खाणाखुणा झाल्यावर सर्वाना घरात घेतले. जवळ जवळ १० ते १५ जण होते. परत काकींनी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि जेवायला वाढले. त्यातल्या जी. डी. बापू लाड ह्यांच्याकडे बंदूक होती. तेवढ्या थोड्याशा वेळात त्यांनी बेबी आणि लीला (ग काका व काकी यांच्या मुली) ह्यांना बंदूक धरायला व नेम लावायला शिकवायचा प्रयत्न केला. पण बंदुकीचे वजन जास्त असल्याने त्यांना दोन्ही हातानी उचलून घेणे सुद्धा जमत नव्हतं. काकींनी सगळ्यांना गरम गरम भाकरी दिली आणि जेवणानंतर सगळे झोपायला गेले. उजाडायच्या आत सगळे निघून पण गेले. ग काका पण सोबत गेले आणि २ दिवसांनी परत आले. त्यांनी सांगितले लीलाताईंना पुण्यात अटक झाली आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवले होते. त्यांनी आजारी पडण्याचे नाटक केले आणि त्यांना दवाखान्यात भरती केलं. तिथून त्यांना सायकलवरून पळवून आणत आहेत. वाटेत सगळ्या सायकलवाल्या जोडप्यांची तपासणी सुरु आहे. आणि त्यात लिलाताईंनी कपाळाला गोंदवले होते ते काढून टाकले तरी ते दिसत आहे. पुण्यावरून थेट कुंडलला आणून लपवायचे आहे. त्यांना लपवून ठेवणे पण धोक्याचे आहे. तेव्हा काकी म्हणाल्या बेबीला त्यांची लेक म्हणून त्यांच्या सोबत ठेवू, म्हणजे लेकुरवाळी म्हणून कोणाला संशय येणार नाही. काका काकी बेबीला घेऊन कुंडल येथे आले. तिथे आल्यावर बेबीला सांगितले, आजपासून इथे असेपर्यंत लिलाताईंना तू आई म्हणायचे आणि मला काकी. लीलाताई सांगत असत की आम्ही सुट्टीसाठी आलोय, आणि बेबी सांगत असे ही माझी आई आहे आणि ह्या काकी. (लीलाताई आई व खरी जन्मदाती आई ही काकी). पोलिसांना कोणताही संशय आला नाही, आणि काही दिवसांतच लीलाताई आपल्या गावी परत गेल्या.
१९४२ ला ‘चले जाव’ आंदोलन सुरू झाले. सगळ्या भूमिगत क्रांतिकारकांच्या अंगात स्फुरण चढलं आणि त्वेषाने परत इंग्रजांच्या विरुद्ध बंड सुरु केले. पत्री सरकारने गावातील अनेक टगे, गावगुंड, सरकारी हस्तकांना, फितुरी पाटलाला देशद्रोही पणाचे प्रायश्चित दिल्याबरोबर गोरे सरकार चवताळून उठले. त्यांच्या जिव्हारी हा टोला होता. एवढया संरक्षणात असलेल्या पाटलाला भूमिगतांनी शिक्षा करायची म्हणजे काय? पाटलाचे हातपाय तोडले नाहीत, तर सरकारचे हातपाय तोडल्या सारखी सरकारची अवस्था झाली. सातारचा गोरा डी. एस. पी. गिल्बर्ट (सिंधमधील हुरांचे बंड मोडून काढणाऱ्या या क्रूरकरम्याला साताराचे बंड मोडून काढण्यासाठी मुद्दाम नेमले होते.) चवताळून उठला. शिकारीसाठी रान उठवावे तसे गावच्या गाव झोडपायला सुरवात केली. मूर्तिमंत क्रूरपणा गिल्बर्टने धारण केला. एके दिवशी गिल्बर्टला कोणी तरी खबर दिली की गावचा इनामदार गंगाधर चिटणीस हेच ग काका आहेत आणि ते भूमिगत क्रांतिकारकांना वाड्यात लपून ठेवतात व मदत करतात. तसेच त्यांना संपूर्ण गाव मदत करतो. हे समजल्यावर तिथले इंग्रज अधिकारी प्रचंड चिडले आणि संतापले. त्यांनी संपूर्ण चिखलगोठण गावाला पहाटेच वेढा दिला. गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस आत येणार नाही असा बंदोबस्त केला होता. गावाप्रमाणे गावचे इनामदार गंगाधर चिटणीस हे या भूमिगतांचे पुढारी होते म्हणून प्रथम त्यांच्या वाडयाला पोलिसांचा मजबूत वेढा घातला होता, मुंगी सुधा शिरणार नाही असा. ग काकांना निसटायची संधी पण मिळाली नाही. सगळे कसे अचानक घडले. ग काकांना अंथरूणातून ओढून काढले व चावडीच्या पटांगणात आणले. त्या आधीच पोलिसांनी गावातील प्रत्येक घरातील मोठ्या व्यक्तीला पकडून चावडी वर आणले होते. गावातील झाडून सारी माणसे पकडून आणली. एकालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्या सगळ्या लोकांना पोलिसांसमोर बसवले. गोऱ्या डी. एस. पी. ने पिस्तुल काढले, तो थरथरत होता, रागाने लालबुंद झाला होता. तोंडातून शिव्यांची लाखोली वाहत होता. ‘सरकार को तुम लोग क्या समज रहे है, जो सरकारला हात लावील त्याचा मुडदा पाडून टाकू. गोळी मारू. हा साला इनामदार, बेईमान हरामखोर, आमचेच खातो व आमच्यावर उलटतो काय, उठाव उसको. हुकुम निघताच ग काकांना चावडीच्या पटांगणात दोघातिघा अधिकाऱ्यांनी खेचून आणले आणि त्यांना अंगठे धरून ओणवे उभे केले, आणि पाठीवर काठ्यांचा मारा सुरु केला. काकांनी हुं कि चुं केले नाही. ग काका म्हणत होते “चरखा चला चला के लेंगे, स्वराज्य लेंगे’, ‘चलाव लाठी चलाव दंडा | उडायेंगे अपना झंडा’, ‘मरेंगे, लेकीन पिछे नही हटेंगे. हे ऐकल्यावर गिल्बर्ट जामच चवताळला आणि त्याने आदेश दिले अजून झोडपून काढा ह्यांना. शेवटी त्यांची ताकद संपली आणि ते खाली कोसळले, ते जमिनीवर आदळेपर्यंत गुरासारखा मार चालला होता. गावच्या पोलीस पाटील व इतर दोघाचौघा गावप्रमुखांना पण तसेच झोडपण्यात आले. नंतर मेंढ्या ठोकतात तसे जमलेल्या गावातील सर्वाना भोवताली असलेल्या पोलिसांनी झोडपून काढले. डी. एस. पी. गिलबर्टची छडी सपासप बसत होती. चोपदारांचे मारून मारून हात दुखायला लागले तेव्हा कुठे हे अघोरी कृत्य थांबले. पण गिल्बर्टच्या क्रूरपणाचा परिणाम काय झाला, 'केला जरी पोत बळेची खाले | ज्वाला तरी ते वरती उफाळे'. मार देऊन, अब्रू घेऊन साधले काय? तर संपूर्ण चिखलगोठण गावातील बच्चा नी बच्चा भूमीगतांचा पाईक बनला. गावातील उरली सुरली भीतीही नाहीशी झाली. सबंध गावाची एकजूट झाली. गावच्या इनामदारच्या नेतृत्वखाली सारा गाव भूमीगतांचा बालेकिल्ला झाला. गोऱ्या डी. एस. पी. च्या दडपगिरीने संपूर्ण गावाला पोलादी पाणी चढवले, त्यामुळे संपूर्ण गाव देशप्रेमाने पेटून उठला. चिलखगोठण गावाने भूमिगत क्रांतीकरकांची सेवा केली, त्यासाठी फार कष्ट सोसले. त्यागाने व जिद्दीने पूर्ण चिखलगोठण गाव इंग्रज सरकारच्या विरोधात गेला आणि तेथील इनामदार ग काका हे त्यांचे सरदार बनले.
हां हां म्हणता अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. सगळीकडे आनंदीआनंद झाला. चिखलगोठण गाव पण आनंदात होता. प्रत्येक घराबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. घराघरात गोडधोड बनवलं होतं. सगळी पोरं झेंडे घेऊन पोवाडे व गाणी म्हणत गावभर पळत होती. चिटणीस वाडा पण फुलांनी सजवला होता. स्वातंत्र्यानंतर ग काका व काकी शेती करायला लागले. औषधांबद्दल माहिती होती म्हणून अडीअडचणीला काकी गरजूंना औषध पण द्यायच्या. असेच त्यांचे पुढचे दिवस मजेत चालले होते. गावात काही सोयी सुविधा आणायच्या हेतूने काकांची धडपड असायची. गावात शाळा, लाईट, पाणी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. तेवढ्यात नथुराम गोडसे या ब्राम्हणाने गांधीजींची हत्या केली आणि संपूर्ण भारतात आगडोंब उसळला. काही समाजकंटकांनी (गांधी समर्थक अहिंसेच्या पुजाऱ्यांनी) ब्राम्हणाची घरे / वाडे जाळली, त्यात ग काकांचा वाडा पण खाक झाला. ग काका हे ब्राम्हण नसून सीकेपी होते. पण त्यांच्याच काही आप्तांनी हे ब्राह्मणाचे घर आहे म्हणून त्या लोकांना सांगितले, आणि वाडा जाळायला लावला. महाराष्ट्र सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन ग काकांचा गौरव केला खरा, पण स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना खूप कष्टात दिवस काढावे लागले. सांगलीचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने ग काकांनी कळवा ग्रामस्थांची सुद्धा वेळोवेळी निःस्वार्थ मदत केली. आता ग काका आणि काकी हयात नाहीत, पण त्यांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या पुढच्या पिढ्या आपापल्या क्षेत्रात सन्मानाने आणि स्वाभिमानाने कार्यरत आहेत.
आजी, आजोबा आणि आई ह्यांना, आणि त्यांच्यासारख्या असंख्य अज्ञात क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन.
|| वंदे मातरम ||
आजोबा आणि आजी |
आभार
सी.के.पी. टाईम्सच्या स्वातंत्र्यदिन अंकासाठी हा लेख लिहिण्यासाठी माझा मामेभाऊ तेजस चिटणीस ह्याने बरीच मेहेनत घेतली. त्याने अनेक संदर्भ गोळा केले. माझा मामा जीवन चिटणीस आणि मामी मंजुषा चिटणीस ह्यांनी पण त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती पाठवली. ह्या तिघांना आणि इतर मावस भावंडांना त्यांनी वेळोवेळी केलेल्या सुचनांबद्दल धन्यवाद. ह्या लेखाचे पूर्ण क्रेडिट मी तेजसला देतो. ह्या लेखास साचेबद्ध करण्याचे आणि फिनिशिंग टच देण्याचे काम फक्त मी केले आहे.
संदर्भ व आधार
१) आईच्या हस्तलिखित आठवणी.
२) भारत क्रांती, शिरपूर. २८ मे १९६५ मधील लेख-
१९४२ च्या लढ्याच्या गोष्टी - लेखक, प्रकाशक, संपादक डॉ. उत्तमराव पाटील.
३) पत्री सरकार - लेखक व. न. इंगळे.
४) दै. दलितनारा - अॅड. हरिष खोब्रागडे, संपादक अॅड. पं. कृ. भडकमकर.
५) क्रांतिपर्व - डॉ. उत्तमराव पाटील
No comments:
Post a Comment