आम्ही आलो त्यावेळेस इथे हिवाळा सुरू होता. विमानातून उतरलो तेव्हा सर्व घरे, रस्ते पांढऱ्या स्वच्छ बर्फाने आच्छादलेले होते. सुरुवातीला स्नोफॉलचे एवढे कौतुक वाटायचे की भुरुभुरू सुरुवात झाली तरी मी चेकाळल्यासारखा फोटो काढत होतो. नंतर नंतर जसजसा जोर वाढू लागला तेव्हा इथे लोक कसे काय राहू शकतात अशी शंका वाटू लागली. सूर्य पाहायला मिळाला की इकडची लोकं खुश का होतात हे इथे अनुभवायला मिळाले. प्रसन्न आणि दीपाली कामावर निघाले की काळजी वाटायची. पण त्या दोघांना ह्याची सवय होती, आणि ते निर्धास्त होते. एका शनिवारी एवढा हिमवर्षाव झाला, की रस्त्यावर जवळजवळ दिड ते दोन फुटांचा थर साठला होता. आमचा भाचीकडे जायचा प्लॅन होता तो रद्द करून घरात थांबावे लागले. मी ह्या बर्फात, परत कधी बघायला मिळेल ना मिळेल ह्या भावनेने, मस्तपैकी घराबाहेर जाऊन त्या वातावरणाचा अनुभव घेतला. संपूर्ण रस्त्यावर मीच एकटा वेड्यासारखा हिमवर्षावातफोटो काढत उभा होतो. मजा आली. दुसऱ्या दिवशी भाचीकडे गेलो तेव्हा रस्त्यात इतके मनोहर दृश्य होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा स्वच्छ बर्फ. झाडांवर अधून मधून घरंगळलेला उरलेला बर्फ. इथे एक छान आहे, बर्फ पडला की एक तासाच्या आत मुख्य रस्त्यांवरचा बर्फ बाजूला काढला जातो, आणि एक प्रकारचे मीठ रस्त्यांवर पसरण्यात येते जेणेकरून उरलेला बर्फ वितळून जाईल. आडरस्ते चोवीस तासाच्या आत मोकळे केले जातात. सर्व घरमालकांनी सुद्धा चोवीस तासांत आपापल्या घरासमोरचे पादचारी मार्ग बर्फ काढून स्वच्छ करायचे असतात. त्यामुळे रस्त्यावरचे अपघात नगण्य असतात.
कधीकधी मी एक वर्षाच्या एझलला घेऊन सुद्धा बर्फात चक्कर मारून आणायचो. लाललाल व्हायची, पण मजेत असायची. एक दिवस तर ताशी ४८ किमी वेगाने वारे व्हायला लागले. त्यात स्नो फॉल चालू होता. घरात बसून वादळी वाऱ्यात गरागरा फिरत जाणारे हीमकण बघायला मजा येत होती. पण अचानक घरातली हीटींग सिस्टीम बिघडली. आणि घरातले तापमान १७ च्या वर जाणेच बंद झाले. मग प्रसन्नने भल्या सकाळी जाऊन पोर्टेबल हिटर आणले आणि दोन दिवस भागवले. तोपर्यंत मुख्य हिटर बदलून टाकला. ह्या दिवसांत, हिमवर्षावात बाहेर फिरायला जाणे तसे खूपच अवघड होते. तरी प्रसन्न दीपाली गाडी काढून, कधी एखाद्या मॉलला, किंवा एखाद्या बागेत फिरायला घेऊन जायचे. कधी इथल्या हॉटेल मध्ये जेवण व्हायचे. एका रविवारी असेच स्क्वेअर वन ह्या मॉलमध्ये दिवस घालवून घरी येता येता प्रसन्न म्हणाला, अजून सूर्यास्त व्हायला वेळ आहे आपण अजून दुसऱ्या कुठेतरी जाऊन येऊ. नायगारा फॉल इथून एक तासांवराच आहे, त्यामुळे त्याची गाडी नायगाराच्या दिशेने निघाली. नायागराला गाडी पार्क केली आणि उतरलो तर काय जबरदस्त थंडी होती. त्या थंडीत एझलला उतरवणे म्हणजे वेडेपणाच होता. त्यामुळे फक्त मी आणि सुजाता उतरून दहाच मिनिटे कुडकुडत धबधबा जवळून बघून आलो. परत यायचेच आहे तेव्हा नीट बघू म्हणून आम्ही लगेच घरी परतलो. पाच वाजता मिसिसागा वरून निघालो आणि तीन तासात नायगारा बघून परत. असेच एका संध्याकाळी लेक शोअर गार्डनला जाऊन आलो. लेक खूप मोठा, स्वच्छ, निळाशार. हवा थंड होती, पण छान मजा आली.
सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे चालू होत्या. मार्च मध्ये एझलचे डे केअर सुरू होणार होते. २२ मार्चला तिचा पहिला वाढदिवस जोरात करायची तयारी चालू होती. थोड्याच दिवसानंतर हिवाळा संपला की वसंत ऋतू मध्ये शनिवार रविवारला जोडून मुले सुट्ट्या घेणार होती, आणि मग खऱ्या अर्थाने कॅनडा दर्शन आणि खरेदी असे सुरू होणार होते. सुजाताचा १७ एप्रिलचा वाढदिवस नायगारा फॉल जवळ साजरा करायचा ठरले होते. एक आख्खा दिवस नायगारा फॉल जवळ फिरायचे, रात्री तिथेच एका हॉटेल मध्ये राहून रंगीत धबधब्याचे दृश्य बघायचे असा जबरदस्त प्लॅन होता. हॉटेल बुकीग पण झाले होते. अनुया, आमची भाची, आणि नूतन, सुजाताची बहीण, पण येणार होते. आणि ह्या कोरोनाने घाण केली. सगळे ठरलेले बेत धुळीस मिळवले. एझलची शाळा सुरूच झाली नाही. वाढदिवस घरातल्या घरात साजरा करावा लागला. कॅनडा दर्शन काय, घरातून बाहेर पडणे पण बंद झाले. फिरण्यावर मर्यादा आल्या. मुलांच्या पार्क्स बंद झाल्या. एझल घरात बसून वैतागली. मग प्रसन्नने बॅकयार्ड मध्येच लॉन आणले. एझलला वाढदिवस भेट म्हणून मिळालेली बास्केटबॉल आणि घसरगुंडी तिथे ठेवून स्वतःचेच पार्क तयार केले. त्या दोघांचेही घरात बसूनच ऑफिस काम चालू झाले. जसजसे दिवस पुढे जायला लागले, तसे आंतरदेशीय विमानसेवाही बंद झाल्या. आमची तिकीटे तर रद्द केलीच, पण व्हिसा मुदत वाढवावी लागते की काय अशी वेळ येऊन ठेपली. त्या दृष्टीने प्रसन्नचे प्रयत्न सुरू झालेत. आमची औषधे मे महिनाअखेर संपणार, त्याचा बंदोबस्त करावा लागला. भारतीय डॉक्टरचे प्रिस्क्रीपशन इथे चालत नाही. मग ठाण्याची डॉक्टर भाची पूजाकडून आमच्या औषधांचे जनेरिक प्रिस्क्रिपशन मागवले. आता प्रसन्न इथल्या त्यांच्या डॉक्टरकडून प्रिस्क्रिपशन घेऊन आमची औषधेआणणार आहे. मधूनमधून पुष्कर अमृता बरोबर बोलणे होते तेव्हा इथल्यापेक्षा तिकडची परिस्थिती किती भयावह आहे हे समजते. रुहीची सतत काळजी वाटत राहते.
पण काय करणार, आता अशा परिस्थितीत इथे रहायचेच आहे तर मग मजेत राहू ना. हळूहळू मोसम पण बदलायला लागलाय. हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झालाय. उणे सतरा डिग्री वरून तापमान अधिक १४ कडे झुकायला लागले आहे. पण सद्ध्या इथले सगळे विचित्रच चालू आहे. आज कडक उन, तर उद्या पाऊस. कधी कधी उन्हात पण बर्फ पडतोय. अधिक चौदा पर्यंत गेलेले तापमान परत उणे सहापर्यंत घसरले. पण एरवी हिवाळ्यात झाडे जी पार झडून गेली होती, त्याला आता पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. लोकांच्या घराबाहेर निरनिराळी फुलझाडे दिसायला लागलीत. तुलीप, लीली, चेरी ब्लॉसम अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलझाडांनी घरे, रस्ते नटू लागलेत. घरासमोरच्या बाजूला हिरवळ पसरू लागली आहे. पिवळी पिवळी जंगली फुले ह्या हिरवळीत फारच सुंदर दिसतात. सकाळी हवा बरी असेल तेंव्हा जरा फेरफटका मारून येतोय. संध्याकाळी एझलला घेऊन सगळेच जण चालून येतो. दिवसभर घरात बसून, घरातूनच काम करून सगळेच कंटाळलेले असतात, तेवढेच जरा पाय मोकळे होतात. आम्ही जर आज पुण्याला परतलो असतो, तर हा रंगीबेरंगी मोसम बघायला मिळाला नसता. पुढे पुढे तर म्हणे सगळे अजून खूप सुंदर दिसते. बघू, नशिबात असेल तर ते पण बघायला मिळेल, सर्व काही परिस्थितीवर अवलंबून आहे. घरी परतायची जशी ओढ आहे, तशीच इथले सौंदर्य बघायची पण उत्सुकता आहे. जसे देवाच्या मनात असेल तसे. बघू किती मुक्काम वाढतोय ते. तोपर्यंत ठरवलेय, आहेत ते दिवस मजेत घालवायचे.
खूप छान वर्णन. फोटो पण मस्त आले आहेत. करोनामुळे संधी मिळाली आहे तरी तेधील रंगीबेरंगी मोैसमाची मजा घेे.
ReplyDeleteThank you. जवळपास का होईना, इथे फिरता येतय. त्यामुळे हे सगळं बघता येतंय.
Deleteनेहमी प्रमाणे अतिशय सुंदर वर्णन! वाचताना डोळ्यासमोर प्रसंग उभा करण्याची तुमची शब्द शैली मला नेहमी भावते. काळजी घ्या सर्वजण.
ReplyDeleteThanks for appreciation. तुमचे पण नवीन नवीन प्रयोग बघत असतो. मस्त एन्जॉय करताय. 👍😊
Deleteखूप छान आणि अगदी सविस्तर वर्णन केले आहे. इकडचे वेध लागणे साहजिक आहे पण आता आपल्या हातात काहीच नसल्यामुळे तिकडेच मजेत राहा आणि वसंत ऋतूचे सर्व रंग एन्जॉय करा. नायगारा थिजलेला बघितला तसा खळखळणाराही बघण्याचा योग आहे कारण या महिन्यात सर्व बर्फ वितळून आता नेहमीसारखे उग्र रूप धारण करेल. बोटी सुरु झाल्यास बोटीतून नायगाराच्या पायथ्यापर्यंत जाता येईल. कोरोनामुळे हे सर्व करण्याची संधी मिळणार नक्की 👍
ReplyDeleteएकदम सुकलेली झाडे हळूहळू पालवी फुटत जाते ते पाहायला मस्त वाटते. बऱ्याच ठिकाणी फुले पूर्ण उमललीत. आपल्या समोरची सावकाश उमलतात असे प्रसन्न म्हणतो. कदाचित आम्ही असेपर्यंत बघायला मिळतील असे वाटते. नायगारा बघणे आपल्या हातात नाही. पण काही दिवसांत ओपन करतील असे वाटते. बघू काय होतंय ते.
DeleteYour writing, description of incidences are so heart touching thay we each one of us are felt as if we are enjoying it. It's now extended opportunity to enjoy summer there. Your approach to take things positively, make memorable by catchibg in camera and enjoy the occasion and share it with others is appreciable.
ReplyDeleteThanks for your encouraging comments. May I know your name please?
Delete