Pages

Saturday, May 25, 2013

काय चाललय काय हे ?

आय पी एल मध्ये सद्ध्या जे चाललय हे कधीतरी बाहेर पडणार होतच. एकजण अडकला की तो इतरांना सापळ्यात खेचणारच. पण सद्ध्या मुख्य विषय वेगळाच आहे.

हे जे बेटींग चालले आहे तो सगळा पैसा त्या हरामखोर पाकीस्तानी गुंडांना मिळतोय. म्हणजे इनडायरेक्टली ही नालायक मंडळी त्या अतिरेक्यांना पैशाचे पाठबळ देत आहेत. एवढीसुद्धा अक्कल ह्या बैलांना नाही की स्वतःच्या स्वार्थासाठी हे साले हरामखोर देशाच्या शत्रूशी हातमिळवणी करत आहेत. पैशासाठी आई बापाला विकणाऱ्याची ही औलाद नष्ट करायला हवी.

त्यामुळे बेटींग कायदेशीर करावे कि नाही हा विषय तूर्त बाजूला ठेवून ह्या देशद्रोह्यांविरुध्द कडक कारवाई व्हायलाच हवी. फक्त बेटींग बेकायदेशीर आहे म्हणून तेव्हढीच शिक्षा नको, देशद्रोहासाठी कायद्यात जी शिक्षा आहे तीच शिक्षा ह्या बेमुवर्तखोर मंडळींना व्हायलाच पाहीजे.

पाकीस्तानी खेळाडूंना बंदी घाला म्हणणारी मंडळी पाकीस्तानी पंच आणि समालोचकांना कसे काय चालवून घेतात? सगळे साले भारतात येवून पैसे कमावतात आणि हे असे आपल्यावरच उलटतात. त्या पाकीस्तानी पंचाबरोबर पाकीस्तानी समालोचकांना सुद्धा संशयाच्या जाळ्यात खेचायला हवे. आणि फक्त भारतीय खेळाडूच फिक्सिंगमध्ये कसे काय, परदेशी खेळाडू काय धुतल्या तांदुळासारखे स्वछ असू शकतात काय?

आणि दिवसभर बडबड बडबड करत बसणारे ज्येष्ठ क्रिकेटियर मंडळी आता मूग गिळून गप्प का बसलेत? त्यांना काय तो श्रीनिवासन स्वतःच्या खिशातले पैसे देतोय का म्हणून अजून कोणी काही मतप्रदर्शनसुद्धा करायला टाळतोय? शरद पवार, अरुण जेटली ह्यांच्यासारखी क्रिकेटचे राजकारण करणारी मंडळी पण मिडिया समोर यायला का कचरत आहेत? अण्णा हजारे, केजरीवाल तुम्ही तरी काही बोला, ती किरण बेदी एकटीच बोलत आहे.

ह्या सगळ्यात एकच चांगली गोष्ट म्हणजे पोलिस मनापासून काम करत आहेत. ह्या राजकारणारी लोकांना एक कळकळीची विनंती कि ह्यात आता हस्तक्षेप करू नका, आणि तपास संपेपर्यंत स्वतःच्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी बदल्यांचे अस्त्र वापरू नका, बूमरेंग होईल.

Friday, April 5, 2013

कुलदेवता

काही कारणास्तव बऱ्याच जणांना आपल्या देवीच्या दर्शनासाठी जाणे जमत नाही. 
त्यांच्यासाठी हे काही मूळ स्थानावरचे फोटो अपलोड करत आहे. 

 १. बापूजीबुवा , कडापे.

 
२. कालिकामाता, कडापे.


३. एकविरा देवी, कार्ले.

४. विंझाई देवी, ताम्हीणी.


५. केदार जननी.

Saturday, June 2, 2012

आमच्याकडची एक जुनी प्रथा


तुम्हाला आमच्याकडची एक  जुनी प्रथा सांगतो.

आमच्याकडे दिड  दिवसांचा गणपती असतो. गणपतीला गोड मोदक आणि ईतर बिन कांदा लसणाचा शाकाहारी नैवेद्य असतो. बहुतेक  सर्वत्र हेच असते.

मग  गणपती  गेले की गौरी येतात. गौरी बसतात त्या दिवशी परत शाकाहारी नैवेद्य. पण  दुसऱ्या  दिवशी  गौरीचे मुख्य जेवण म्हणजे  मटण. कारण  का  तर गौरी  म्हणजे माहेरवाशीण. तीला शंकराकडे  असले काही  मिळत  नाही. म्हणजे तिकडे ह्या गोष्टीचा शब्दोच्चार  पण  नाही. म्हणून  तिच्या  आवडीचे आणि तिला सासरी मिळत  नाही ते मटण  हे  मुख्य जेवण.

आता  गणपती  बाप्पांचे  नाक  म्हणजे केव्हढे  लांब. त्याला  घरी जाता जाता  वास  येतो. घरी गेल्यावर तो  त्याच्या बाबांकडे  त्याची शंका व्यक्त  करतो. शंकर महाराज म्हणजे शीघ्र कोपी. ते लगेच  निघतात  काय  चाललेय  ते बघायला. पण इकडे  येवून  बघतात  तर काय  जेवणात  सर्व शाकाहारी आणि छान  छान  गोड प्रकार.

कारण  असे होते की मटण  खाऊन  तृप्त  झाल्यावर दुसऱ्या दिवशी  सकाळी सकाळी  गौरी बाईंना गणपतीच्या चुगलखोरी बद्दल शंका येते. ती सगळ्यांना सांगते की आता पटापट  आवरा आणि आज  फक्त  शाकाहारी जेवणच करा. म्हणून  तिसऱ्या  दिवशी आमच्याकडे फक्त  शाकाहारीच नैवेद्य  असतो. हे सर्व  शंकर देव बघतात  त्यावेळेस  त्यांचा राग शांत  होतो, कारण  शंकर देव  यायच्या आत सगळे  चकाचक झालेले   असते.

गोष्ट  छान आहे कि नाही? पण  मतीतार्थ लक्षात  घ्या.  देवाच्या नावाने प्रथा कशी पडते हे लक्षात  येईल.

(गंमतीची गोष्ट बघा, सी.के.पी. माहेरवाशीण शंकर आणि गणपती सारख्या  देवांना सुद्धा उल्लु  बनवते..
हे गमतीत  हं नाहीतर ह्याच्यावर चर्चा कराल.)

Tuesday, May 8, 2012

पुष्कर तलाव, राजस्थान





पुष्कर हे हिंदू धर्मियांचे एक  मुख्य तीर्थस्थान आहे. ब्रम्हदेवाचे एकुलते एक  मंदिर पुष्कर येथे आहे. पुष्कर येथे आल्याशिवाय  चार धाम यात्रा  पूर्ण  झाली  नाही असे म्हणतात.  पर्यटक  अजमेरच्या दर्ग्याला भेट देतात, पण  पुष्कर हे तीर्थस्थान अजमेर पासून खूप जवळ आहे हेसुद्धा बऱ्याच जणांना माहित नसते. इथला गुलकंद  भारतभर प्रसिद्ध  आहे. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. राजस्थान  टूरमध्ये पुष्कर हे स्थळ आवर्जून  पाहावे असा फुकटचा सल्ला मी देऊ इच्छितो.


सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण





सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण ऐकले. १०० टक्के सत्य आहे.
आम्ही सूरपारंब्या खेळलो, मुले विटी-दांडू सुद्धा खेळू शकली नाही.
आम्ही चिन्चा, कैऱ्या पाडून  खाल्ल्यात, मुलांना त्या दुकानात विकत घेऊन खाव्या लागल्या.
आम्ही नदीचे पाणी प्यायलो आहोत, हल्ली नदीचा वापर सांडपाण्यासारखा होतोय.

आमच्या शिक्षकांच्या हातात छडी असे, आमची मुले शिक्षकांच्या खांद्यावर हात टाकून चालतात.
३० पर्यंत पाढे आमच्या अजून लक्षात आहेत, मुलांना टू इंटू टू साठी काल्क्यूलेटर लागतो.

आमच्या वेळेस फुटपाथवर लोक चालायचे, हल्ली फुटपाथ विक्रेत्यांसाठी राखीव असल्यासारखे झालेत.
आम्ही दहा दहा किलोमीटर गप्पा मारत चालत जायचो, हल्ली रस्ता ओलांडायला जीव मुठीत धरावा लागतो.
आम्ही आजोबांना दवाखान्यात घेऊन जायचो, आता मुलांसाठी दवाखान्यात जावे लागते.
मोकळ्या हवेत फिरले कि फ्रेश वाटायचे, आता कधी एकदा ह्या धुराड्यातून सुटून घरात पोचतो असे वाटते.

सगळे काही बदलून गेलेय. निसर्ग बदललाय, शिक्षणपद्धती बदललीय, शिस्त बिघडलीय.
आमच्या मुलांची हि परिस्थिती, तर सेवेम सुझुकी म्हणते तसे खरेच त्यांच्या मुलांची काय परिस्थिती असेल?
वेळेत जागे झालो नाही तर भविष्यात चंद्रावरच्या जागेसाठी पृथ्वीवर युद्धे झाली तर आश्चर्य वाटू नये.

Monday, March 26, 2012

किल्ले सिंधुदुर्ग, मालवण

पोर्तुगीज, ब्रिटीश आणि मोघलांवर लक्ष ठेवण्यासाठी सन १६६४ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. मालवण शेजारी एका दगडी बेटावर हा किल्ला बांधला असून सर्व बाजूंनी समुद्राने वेढला गेला आहे. गोव्यावरून शंभरेक तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ३००० कामगारांकडून ह्या किल्ल्याचे बांधकाम करून घेतले आहे. बांधकामासाठी त्या बेटावरच्याच मोठमोठ्या खडकांव्यातिरिक्त २००० खंडी लोखंड वापरण्यात आले. भक्कम पायाभरणीसाठी काही खंडीभर शिश्याचा वापर केला गेला.


किल्ला पाहायला सुमारे एक तास तरी लागतो. पण किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्र पाहण्याची मजा काही औरच आहे. हा व्हिडीओ उन्हाळ्यात घेतला आहे, पावसाळ्यानंतर छान हिरवेगार वातावरण असते.




आशा आहे हा व्हिडीओ पाहिल्यावर आपणपण ह्या किल्ल्याला जरूर भेट द्याल.

Wednesday, October 19, 2011

माझी आवडती गाणी

नमस्कार,

मराठीमध्ये खुप सुंदर आणि छान छान गाणी आहेत.
भावगीत, नाट्यसंगीत, लावणी, पोवाडे अशी विविध प्रकारची गाणी आहेत.
त्या त्या वेळेस आपला जो मूड असेल त्याप्रमाणे तो तो प्रकार ऐकायला आवडतो.
पण ही जी तीन गाणी आहेत ती मला कुठल्याही वेळेस ऐकायला आवडतात,
आणि त्याप्रमाणे माझा मूड आपोआप बदलतो.

"एका तळ्यात होती" हे गाणे माझे सर्वात आवडते.
लहानपणी हे गाणे ऐकायच्या आधी आईने ह्याची गोष्ट सांगितली होती.
ती गोष्टच मला इतकी आवडली होती, कि हे गाणे जेव्हा प्रथम ऐकले तेव्हापासून त्याच्या प्रेमात पडलो.
ह्या गाण्याचा खरा अर्थ समजून घेतला तर तुम्हालाही हे गाणे खूप आवडेल. 

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक 

कोणी न तयास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक 

पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक 
होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक 

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळले, तो राजहंस एक 

गाणे ऐका





कसे वाटले गाणे? खूप सुंदर आहे ना?


"आकाशी झेप घे रे पाखरा" हे असेच एक सुंदर गाणे.
त्यातील अर्थ इतका भन्नाट आहे.
माझी मुले ज्यावेळेस एक एक करून पुणे सोडून गेली, त्यावेळेस ती आता आपल्यापासुन लांब गेली ह्याचे खुप वाईट वाटले होते. 
आणि त्याच वेळेस हे गाणे कानावर पडले.
मुलांनी झेप नाही घेतली तर ते आकाशाची मजा कशी चाखणार हे मला जाणवले.


आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुज भवती वैभवमाया,
फळ रसाळ मिळते खाया,
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेशी आसरा

घर कसले ही तर कारा,
विषसमान मोतीचारा,
मोहाचे बंधन द्वारा,
तुज आडवितो हा कैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने,
कर विहार सामर्थ्याने,
दरी डोंगर हिरवी राने,
जा ओलांडुनी या सरिता सागरा

चला हे गाणे पण ऐकू या..




गाणे ऐकून थोडे एन्करेज झाल्यासारखे वाटले ना?


"या चिमण्यांनो परत फिरा रे" ह्या गाण्यातील अर्थ ज्यांची मुले जवळ नाहीत,
आणि आई बाप आपले त्यांच्या भेटीची वाट बघत बसले आहेत, त्यांना जास्त जाणवेल.
हे गाणे ऐकताना मुलांची खूप आठवण येते, पण त्यांच्या भविष्याचा विचार करून गप्प बसावे लागते.


या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगाच चिंता मज लागल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, तळाकडे उतरल्या

अवतीभवती असल्यावाचुन, कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधिही कामाचा
या बाळांनो, या रे लौकर, वाटा अंधारल्या


नीट लक्ष देऊन ऐका..


काय हे गाणे ऐकून डोळ्यात पाणी आले की नाही?

आहेत की नाही तीनही गाणी सुंदर? प्रत्येकाचा भाव वेगळा, आनंद वेगळा.
माझ्यासारख्या, ज्याला गाण्यातले काहीही कळत नाही,
त्याला सुद्धा ही गाणी मोहून टाकतात, गाणी ऐकताना गहिवरून येतं, म्हणजे त्यात काही जादू असलीच पाहिजे.

चलो बाय, जमल्यास परत भेटू..