Pages

Saturday, October 24, 2020

टोरोंटो ते पुणे - कोरोना वातावरणातील एक अनोखा प्रवास

प्रवास कसा प्लॅन्ड असावा हे माझ्या दोन्ही मुलांकडून शिकावे. प्रसन्नने आमच्या वयाला सुटसुटीत होईल, ले-ओव्हर वेळ जास्त नाही, कमी नाही, बॅगा आणि इमिग्रेशन सुरळीत होईल, लवकर बुक केले तर रेट पण जास्त नसतील, ह्या आणि अशा इतर सर्वाचा विचार करून ब्रिटिश एअरवेज ची मुंबई-हिथ्रो-टोरोंटो, आणि ह्याच मार्गाने, म्हणजे टोरोंटो-हिथ्रो-मुंबई,परत अशी तिकिटे काढली. माझ्या आधीच्या लेखात ( लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा ) लिहिल्याप्रमाणे आमचा कॅनडात नाट्यपूर्ण  प्रवेश झाला. आता परत मात्र निवांतपणे जायला मिळावे असे वाटत असतानाच कोरोनाने सगळ्यांचे प्लॅन्स धुळीत मिळवले. पहिले १० मेचे, आणि मग ३१ जुलैचे, अशी दोन्हीही तिकिटे रद्द करावी लागली. दरम्यान एझल, प्रसन्न, सुजाता आणि दीपाली ह्या सगळ्यांचे वाढदिवस झाले. ज्यावेळी दुसरे तिकीट रद्द झाले तेंव्हा प्रसन्न म्हणाला, बाबा आता तुमचा पण वाढदिवस इथेच करू आणि मग तुमच्या परतीच्या तिकिटाचे बघू. पण दोन वेळा तिकिटे रद्द झाली होती, आता मिळेल ते तिकीट काढ, वाढदिवसाचे काय दरवर्षी येतो, असे सांगून १ ऑक्टोबरचे ब्रिटिश एअरवेजचे जे मिळाले ते तिकीट काढले. मधून मधून मी बघत होतो की हिथ्रो ते मुंबई  ब्रिटिश एअरवेजचे विमान मुंबईला उतरत आहे. टोरोंटो ते हिथ्रो विमानसेवा पण सुरू होती. परंतू एक धाकधूक होतीच, टोरोंटो ते  हिथ्रो ही आमची कनेक्टींग फ्लाईट १ ऑक्टोबर पासूनच सुरू होणार होती. तिला जर हिरवा कंदील नाही मिळाला तर? आणि शेवटी तसेच झाले, ईजा, बीजा, तीजा, ब्रिटिश एअरवेजचा प्रवास रद्द झाल्याचा ईमेल आला. ह्या कॅन्सलेशनचा आता वैताग आला होता. प्रसन्न बिचारा ऑफिसचे काम आणि आमचे बुकिंग ह्यात हैराण झाला होता, पण तो ते दाखवत नव्हता. शेवटी वंदे भारत शिवाय पर्याय नाही हे लक्षात आले, कारण ह्या फ्लाईट रद्द झाल्या असे कधी झाले नव्हते. लवकरात लवकर जे मिळेल ते तिकीट काढण्याचे ठरले. २९ तारखेची तिकिटे शिल्लक आहेत असे समजले. एअर इंडियाला फोन करून लगेज आणि ईमिग्रेशन मुंबईलाच होईल हे नक्की करून घेतले. आणि प्रसन्न दीपालीच्या ५ ऑक्टोबरनंतर तिकिटे काढण्याचा आग्रह त्यांना सद्यस्थितीत बाजूला ठेवायला सांगून प्रसन्नला मिळतंय ते तिकीट काढायला सांगितले.

एअर इंडियाची तिकिटे काढून झाल्यावर आता पुढे भारतातील क्वारंटाईनचे नियम, प्रवासातील सुविधा सोयी ह्याचा अभ्यास सुरू झाला. कोव्हिड टेस्ट करून गेलो तर सर्व चौदा दिवस होम क्वारंटाईन करायल  मिळणार होते. त्यासाठी टेस्टिंग सेंटर्सकडे चौकशी करता रिपोर्ट वेळेवर मिळतील ह्याची कोणी खात्री देईना. मग सात दिवस पुण्याच्याच हॉटेल मध्ये राहून सात दिवस घरी क्वारंटाईन पिरियड संपवायचे ठरले. त्याप्रमाणे प्राइड हॉटेलचे बुकिंग पण केले. नंतर कॉन्स्युलेट ऑफिसचा फॉर्म, सेल्फ हेल्थ रिपोर्ट वगैरे फॉर्म भरले. प्रसन्न-दीपालीने, घरी गेल्यागेल्या काही मिळाले नाही तर असू द्या, म्हणून रेडी टू ईट पॅकेट्स, दुधाची पावडर, चहा, कॉफी, बिस्किटे वगैरे सगळे आणून ठेवले. बॅगा भरून, त्याची वजने करून प्रवासाची सर्व जय्यत तयारी झाली. पण जोपर्यंत विमानात बसत नाही, तोपर्यंत आम्ही कॅनडाहून निघालो असे म्हणायला धजावत नव्हतो. आणि निघायचा दिवस उजाडला. एझलला दोन दिवस सर्दी होती, आणि बाहेर हवा पण थंड होती, त्यामुळे दीपाली आणि एझलने घराच्या दारातूनच टाटा केले आणि प्रसन्न आम्हाला घेऊन निघाला. मोठ्या सुनबाईंचे आदेश होते, ग्लोव्हज आणि मास्क घेऊनच एअरपोर्टला जा. विमानतळावर आणि विमानात काय काय खबरदारी घ्यायची ह्याची, तिच्या अनुभवाप्रमाणे इत्यंभूत माहिती दिली. त्याप्रमाणे सर्व सेफ्टीच्या गोष्टी बरोबर घेतल्या. कॅनडामधील आमचा शेवटचा मनोहर सूर्योदय बघत बघत आम्ही एअरपोर्टला पोचलो.

एझल आणि दीपालीचा निरोप घेताना 

कॅनडा मधील आमचा शेवटचा सूर्योदय


एरवी प्रवाश्यांबरोबर त्यांना निरोप द्यायला येणाऱ्यांना पण प्रवेश देतात. पण प्रसन्नची एक सहकारी स्नेहा, तिच्या आईला निरोप देण्यासाठी आली होती तिला दारातच थांबवले. ते सगळे आमची वाट पाहत थांबले होते. आम्ही आधीच चौकशी करून ठेवली होती त्याप्रमाणे प्रसन्नने तेथील सिक्युरिटी ऑफिसरला विनंती केली की आईबाबा सिनियर सिटिझन आहेत, फक्त बॅगा काउंटरपर्यंत नेऊन देऊन लगेच परत येतो. त्या ऑफिसरने आमच्याकडे पाहिले, आणि फक्त एकालाच बरोबर यायची परवानगी दिली. प्रसन्न आणि स्नेहाचे यजमान दोघेच जण आम्हाला सोडायला आत आले. काउंटरवर बऱ्यापैकी लाईन होती. पण सर्वजण शिस्तीत, योग्य अंतर ठेवून उभे होते. सगळ्यांचे थर्मल चेकिंग झाले, आणि पासपोर्ट वर तसा स्टिकर लावला. बॅगा व्यवस्थित चेक इन झाल्या, आणि प्रसन्नला बाय बाय करून आम्ही कस्टमसाठी आत गेलो. मागील प्रवासांच्या अनुभवावरून आम्ही एअरपोर्टवर व्हील चेअर घेणे पसंत केले होते. चालत जायला काही वाटत नाही, पण रांगेत उभे राहिले की गुडघे दुखायला लागतात. ह्या व्हील चेअरमुळे आम्हाला खूप फायदा झाला. कुठेही रांगेत उभे न राहता, दहा मिनिटात आम्ही इमिग्रेशन पास करून पलीकडे गेलो. पुढे त्यांच्याच कार्टने गेट पर्यंत पोचलो. आमचे एक स्नेही नुकतेच ह्या एअरपोर्ट वरून अमेरिकेला गेले होते. त्यांना एअरपोर्ट वर पाणी सोडून काहीही मिळाले नव्हते. त्यामुळे समोर हॉटेल चालू आहे हे बघून काय आनंद झाला. गरम गरम कॉफी घेत आम्ही विमान सुटायची वाट बघत बसलो.


टोरोंटो विमानतळावर बोर्डिंग पाससाठी रांग


टोरोंटो विमानतळावरील कॅफे

एकदाचा विमानात प्रवेश झाला आणि नक्की झाले की आता आपण पुण्याला पोचणार. सीटवर मास्क, शिल्ड आणि फूड पॅकेट ठेवले होते. आम्ही लवकर आत गेल्यामुळे वरच्या कप्प्यात बॅगा ठेवायला आरामात जागा मिळाली. पण हळू हळू सर्व जागा भरल्या, आणि शेवटी आलेल्यांना एक बॅग इकडे, दुसरी बॅग तिकडे अशा ऍडजस्टमेंट कराव्या लागल्या. सुजाताचे मधले सीट होते म्हणून तिला एक सफेत कोट घालायला ठेवला होता. कॅनडा मध्ये दुपार होती, पण भारतात रात्र होती म्हणून असेल, विमान सुरू झाल्याबरोबर सर्व खिडक्या बंद करायला सांगितले, आणि दिवे बंद करून विमानात रात्र सुरू केली गेली. समोरच्या करमणुकीच्या स्क्रीनवर सिनेमा नाही, गेम्स नाहीत, ट्रॅकिंग नाही, तो फक्त एअरलाइन्सच्या सुचनांपुरताच उपलब्ध होता. गपचुप बसून पूर्ण प्रवास करावा लागणार होता. नशीब शेजारी एक मुलगी स्वतःच्या लग्नासाठी निघाली होती, तिच्याशी थोड्या गप्पा मारत वेळ गेला. मधूनच स्नॅक्स खाणे चालू होते. मधूनच डुलकी मारणे सुरु होते. थोड्या वेळाने कॉफीचा वास आला, डोळे उघडून बघतो तर एक प्रवासी कॉफीचे दोन कप घेऊन चालला होता. सुजाता जागीच होती. तिला विचारले, कॉफी मिळाली तर घेणार का. होकार अपेक्षितच होता. पाठीमागे गेलो. तिथल्या केबिन क्रूला विचारले की कॉफी मिळेल का, दोन मिनिटात मस्त गरम गरम कॉफी घेऊन सिटवर परतलो. सीट वर ठेवलेल्या फूड पॅकेट व्यतिरिक्त काही मिळेल अशी अपेक्षाच नव्हती, त्यामुळे ही गरम कॉफी मिळाली म्हणून एकदम खुश झालो. काही तासांनी भूक लागायला लागली. पण कॉफी मिळाली तसे कदाचित जेवण सुद्धा मिळेल ह्या अपेक्षेने बराच वेळ वाट बघत बसलो. शेवटी दीपालीने दिलेल्या पालक पुऱ्या काढल्या आणि जेवण करून घेतले. आणि आता झोपावे म्हणून तयारी करू लागलो तर काय, समोरून फूड पॅकेट वाटपाची ट्रॉली आली. पोट तर बऱ्यापैकी भरले होते, तरी पण पॅकेट उघडून जेवायला सुरुवात केली. आणि एक अनपेक्षित धक्का बसला. चिकन राईस आणि पराठा एकदम गरम गरम आणि चवीष्ट होते. बरोबर कोक पण दिला होता. खरे तर विमानात पाणी सोडून काहीही मिळणार नाही ह्या अपेक्षेने आम्ही बसलो होतो, त्यामुळे हे सर्व मिळणे म्हणजे एक सुखद धक्का होता. व्वा, मस्त ढेकर येईपर्यंत जेवलो. काही वेळाने शेवटची अनाउन्समेंट झाली, आणि फायनली विमान दिल्ली विमानतळावर उतरले. आमचा भारतात प्रवेश झाला.

विमानात पूर्ण सुरक्षा कवच

दिल्लीला विमानातून बाहेर पडलो तो व्हील चेअर घेऊन तिथली मुले वाटच बघत उभी होती. आमचे नाव विचारून, परत एकदा कुठेही रांगेत उभे न राहता त्यांनी गेटवर आणून सोडले. सीसीडी मधून कॉफी घेतली आणि पुढच्या मुंबईच्या विमानाची वाट पहात बसलो. दिल्लीला उतरल्यावर फोन सुरू झाला. लगेच आरोग्य सेतू ऍप चालू केले. पुष्करने ठाण्यावरून पैसे भरून सुद्धा सुजाताचा फोन चालू होत नव्हता. एअरपोर्टचे वायफाय पण बंद होते. मग माझ्या मोबाईल वरून हॉटस्पॉट घेऊन तिचा पण आरोग्य सेतू ऍप सुरू केला. बरोबर वेळेवर विमानाने मुंबई साठी उड्डाण केले. विमानात अगदी तीस बत्तीस प्रवासी असतील, सगळे परदेशातून आलेले. एवढे रिकामे विमान कधीच बघितले नव्हते. परदेशातून घरी परतणाऱ्या प्रवाश्यांची भारत सरकारने खूप छान काळजी घेतली होती. अन्यथा एवढ्याच प्रवाशांसाठी रिकामे विमान कोण सोडणार. विमानात गेल्यावर एअर होस्टेसने विचारले, वेळ आली तर इमर्जन्सीत दरवाजा ओपन करायची माहिती देऊ का, तुम्ही दरवाजा जवळ बसू शकता. मग काय तिच्या सूचना ऐकल्या आणि आम्ही दोघे दरवाजा जवळच्या सीट वर येऊन बसलो. तीनच्या सीट वर दोघे, परत समोर ऐसपैस पाय पसरायला भरपूर जागा. आरामात मुंबईला पोचलो. तिथे परत व्हील चेअरवाल्या मुलांनी फटाफट इमिग्रेशन करून घेतले, आमच्या बॅगा घेतल्या, कस्टम चेक मधून पास करून घेतल्या, आमचे आरोग्य सेतू ऍप ग्रीन स्टेटसवर आणून तो मोबाईल स्क्रीन तिथल्या चेक पॉइंट वर दाखवला, हेल्थ चेक पॉइंट जवळ आमचा फॉर्म भरून दिला आणि आम्हाला बाहेर टॅक्सी पर्यंत आणून सोडले. ह्या मराठी मुलांनी खूपच निःस्वार्थी मदत केली. दिल्लीच्या मुलांना शंभर शंभर रुपये बक्षीस म्हणून दिले तरी त्यांची तोंडे वाकडीच होती. पण ह्या मुंबईच्या मुलांनी स्वतःहून पैसे तर मागितले नाहीतच, पण जे दिले त्यात ते पूर्ण समाधानी होते. बाहेर आमचे मित्र प्रवीण सरकाळे स्वतः त्यांची टॅक्सी घेऊन वाट पहात होते. त्यांच्याशी गप्पा मारत मारत पुणे मुक्कामी हॉटेल प्राइडला सात दिवसांच्या क्वारंटाईन साठी पोचलो.

हॉटेलमध्ये मात्र एका दिवसात कंटाळा आला. एक आठवडा बाहेर पडायला निर्बंध, खोली मोठी असली तरी खोलीतल्या खोलीत किती फिरणार ना. एरवी आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा मस्त वाटते, कारण दिवसभर बाहेर भटकून आलेले असतो. इथे सगळीच पंचाईत.अजून सहा दिवस कसे काढायचे ह्याची चिंता वाटू  लागली. सकाळी वेटरने ब्रेकफास्टसाठी  बेल मारली की उठायचे, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन, (वाटल्यास) आंघोळ करून, टीव्ही आणि मोबाईलशी खेळत बसायचे, परत जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण करून झोपायचे एवढाच काय तो उद्योग. रोज दोन्ही मुलांचे आणि सुनांचे फोन येत होते. आई बाबा काळजी घ्या, इथे कॅनडा सारखे वातावरण नाहीये, मास्क लावून दार उघडा वगैरे सूचना यायच्या. एझल आणि रुहीची खबरबात मिळायची. पण ते सगळे आपापल्या उद्योगात, त्यांच्याशी तरी किती वेळ बोलणार. दहा किलोमीटरवर घर, पण हॉटेल मध्ये दिवस ढकलत होतो. पाच तारखेला सकाळी प्रसन्न आणि दीपालीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल आला. आता दोनच दिवस राहिलेत, परवा घरी पोचू, एझल आठवण काढते पण आता नॉर्मल व्हायला लागली आहे वगैरे गप्पा झाल्या. ह्या दोघांचा कॉल संपताच पुष्कर अमृताचा व्हिडिओ कॉल आला. त्यांच्या बरोबर बोलत होतो तेव्हाच ब्रेकफास्ट घेऊन येणाऱ्या वेटरने बेल मारली. आज उपासाचा ब्रेकफास्ट काय आहे बघण्यासाठी सुजाताने दार उघडून बघितले तर काय, वेटर केक आणि ग्रिटींग कार्ड घेऊन उभे होते. अरेच्चा, ह्यांना कसे कळले माझा वाढदिवस आहे ते? नंतर कळले की ही सगळी अमृताची करामत. आदल्या रात्रीच तिने फोन करून केक आणि ग्रिटींग कार्डची व्यवस्था करून ठेवली होती. ग्रिटींग कार्ड बाहेरून आणणे शक्य झाले नाही म्हणून हॉटेलच्या रोशनी नावाच्या रिसेप्शनिस्टने हाताने ते तयार केले. जबरदस्त सरप्राईज होते. केक रूमवर आणताना बहुधा हॉटेलमधून अमृताला फोन गेला असावा, कारण तिचा फोन आणि वेटर्सचे येणे एकत्र कसे झाले. सुजाता, पुष्कर, अमृता, अमृताची आई, आणि हॉटेलचे तीन वेटर ह्यांच्या समोर (दाढी नाही, आंघोळ नाही, नुकताच उठलो होतो) केक कापला आणि अनपेक्षितपणे माझा वाढदिवस (होय, थाटामाटातच) साजरा झाला. संकष्टी चतुर्थी होती, म्हणून केक नुसताच कापला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला. पण एकंदरीत मजा आली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील.


वाढदिवसा चा सुंदर केक

सुंदर ग्रिटींग कार्ड


आणि फायनली, हॉटेल मधील मुक्काम हलवून, आठ जानेवारीला घर सोडले होते ते बरोबर नऊ महिन्यांनी, सात ऑक्टोबरला स्वगृही सुखरूप पोचलो.




Friday, October 16, 2020

माझा क्वारंटाईन बर्थडे

कॅनडा मधील वास्तव्यात एझल, प्रसन्न, सुजाता आणि दीपाली ह्या सगळ्यांचे वाढदिवस झाले. ज्यावेळी आमचे भारतात परतण्याचे दुसरे तिकीट सुद्धा कॅन्सल झाले, तेव्हा प्रसन्न म्हणाला, बाबा आता हे तिकिटाचे राहू द्या, तुमचा वाढदिवस इथेच करू आणि त्यानंतर तिकिटाचे बघू. पण दोन वेळा तिकिटे रद्द झाली होती, म्हणून आता मिळेल ते तिकीट काढ, वाढदिवसाचे काय, दरवर्षी येतो, असे सांगून त्याला तिकीट काढायला सांगितले. शेवटी वंदे भारत मिशन मध्ये तिकीट मिळाले, आणि एअर इंडियाच्या कृपेने पुणे मुक्कामी हॉटेल प्राइडला सात दिवसांच्या क्वारंटाईनसाठी सुखरूप पोचलो.

हॉटेलमध्ये एका दिवसात कंटाळा आला. एक आठवडा बाहेर पडायला निर्बंध, खोली मोठी असली तरी खोलीतल्या खोलीत किती फिरणार ना. एरवी आपण हॉटेलमध्ये राहतो तेव्हा मस्त वाटते, कारण दिवसभर बाहेर भटकून आलेले असतो. इथे सगळीच पंचाईत.अजून सहा दिवस कसे काढायचे ह्याची चिंता वाटू  लागली. सकाळी वेटरने ब्रेकफास्टसाठी  बेल मारली की उठायचे, ब्रेकफास्ट आणि चहा घेऊन, (वाटल्यास) आंघोळ करून, टीव्ही आणि मोबाईलशी खेळत बसायचे, परत जेवण, दुपारचा चहा, रात्रीचे जेवण करून झोपायचे एवढाच काय तो उद्योग. रोज दोन्ही मुलांचे आणि सुनांचे फोन येत होते. आई बाबा काळजी घ्या, इथे कॅनडा सारखे वातावरण नाहीये, मास्क लावून दार उघडा वगैरे सूचना यायच्या. एझल आणि रुहीची खबरबात मिळायची. पण ते सगळे आपापल्या उद्योगात, त्यांच्याशी तरी किती वेळ बोलणार. दहा किलोमीटरवर घर, पण हॉटेल मध्ये दिवस ढकलत होतो.

पाच तारखेला सकाळी प्रसन्न आणि दीपालीचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल आला. आता दोनच दिवस राहिलेत, परवा घरी पोचू, एझल आठवण काढते पण आता नॉर्मल व्हायला लागली आहे वगैरे गप्पा झाल्या. ह्या दोघांचा कॉल संपताच पुष्कर अमृताचा व्हिडिओ कॉल आला. त्यांच्या बरोबर बोलत होतो तेव्हाच ब्रेकफास्ट घेऊन येणाऱ्या वेटरने बेल मारली. आज उपासाचा ब्रेकफास्ट काय आहे बघण्यासाठी सुजाताने दार उघडून बघितले तर काय, वेटर केक आणि ग्रिटींग कार्ड घेऊन उभे होते. अरेच्चा, ह्यांना कसे कळले माझा वाढदिवस आहे ते? नंतर कळले की ही सगळी अमृताची करामत. आदल्या रात्रीच तिने फोन करून केक आणि ग्रिटींग कार्डची व्यवस्था करून ठेवली होती. ग्रिटींग कार्ड बाहेरून आणणे शक्य झाले नाही म्हणून हॉटेलच्या रोशनी नावाच्या रिसेप्शनिस्टने हाताने ते तयार केले. जबरदस्त सरप्राईज होते. केक रूमवर आणताना बहुधा हॉटेलमधून अमृताला फोन गेला असावा, कारण तिचा फोन आणि वेटर्सचे येणे एकत्र कसे झाले. सुजाता, पुष्कर, अमृता, अमृताची आई, आणि हॉटेलचे तीन वेटर ह्यांच्या समोर (दाढी नाही, आंघोळ नाही, नुकताच उठलो होतो) केक कापला आणि अनपेक्षितपणे माझा वाढदिवस (होय, थाटामाटातच) साजरा झाला. संकष्टी चतुर्थी होती, म्हणून केक नुसताच कापला आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला. पण एकंदरीत मजा आली. हा वाढदिवस कायम स्मरणात राहील.






Sunday, August 23, 2020

आई, आजोबा आणि आजी ह्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणी.

२३ ऑगस्ट २०२०. आज आई ८६ वर्षांची झाली असती. पण दोन महिने आधीच, २४ जूनला, तिने आमचा कायमचा निरोप घेतला. दुर्दैव माझे की ह्या कोरोनामुळे मी तिच्या कोणत्याही अंत्यक्रियांसाठी उपस्थित राहू शकलो नाही. तिच्या स्मृतींना वंदन करून तिच्या आणि तिच्या आईबाबांच्या स्वातंत्र्य संग्रामातील काही आठवणींना उजाळा देत आहे.

आईचा जुना फोटो


(ह्या लेखातील ग काका आणि ग काकी, उर्फ गंगाधर चिटणीस आणि मनोरमा चिटणीस हे माझे आजोबा आणि आजी. आणि कमल उर्फ बेबी ही माझी आई).

ही कथा आहे काळाच्या आड गेलेल्या एका अज्ञात भूमिगत क्रांतिकारकाची आणि त्याच्या कुटुंबाची, सातारा (आता सांगली) जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील, चिखलगोठण ह्या क्रांतिकारी गावातील गंगाधर चिटणीस आणि त्यांच्या कुटुंबाची.


गंगाधर चिटणीस यांना गावात लोक आदराने ग काका असे म्हणत. ग काका हे गावचे इनामदार होते. ग काका यांच्या पत्नी मनोरमा गंगाधर चिटणीस यांना गावात सगळे ग काकी असे म्हणत. ग काका गावचे इनामदार असल्याने पोलिसांची मर्जी सांभाळून सगळ्या क्रांतीकारकांना मदत करत होते. पोलिसांना कधीच त्यांच्या वर शंका आली नाही. त्यांना वाटे की हे आपल्या बाजूने आहेत पण प्रत्यक्षात ते क्रांतिकारांना मदत करत होते हे कोणालाही माहिती नसे. ग काकांचे मुख्य काम भूमीगतांच्या जखमींना सांभाळणे, जखमी होऊन तुरुंगात गेलेल्यांचे खटले चालविण्यासाठी सर्व व्यवस्था करणे, त्यांच्या घरादाराकडे लक्ष ठेवून लागेल ती मदत करणे, फितूर साक्षीदारांना सरळ करण्यासाठी पत्री सरकारला सांगावा धाडणे, इत्यादी. त्यासाठी त्यांना कोल्हापूर ते खानदेश भिंगरीप्रमाणे फिरावे लागत असे. ग काकांनी भूमिगत कार्याच्या कामात धन दिले, मन दिले, आणि त्यांनी त्याचे घरही दिले. ग काकांच्या साऱ्या कुटुंबाने देशसेवेसाठी जणू वाहून घेतले होते. भूमिगत कार्याचे ते एक आधारस्तंभ होते.

ग काकी ह्या मातेने तर आपल्या देहाचा कण अन् कण भूमिगतांच्या सेवेत वेचला. ती भूमिगातांची आई बनली. एकेका वेळेला ५-५० भूमिगत रात्री बेरात्री कधीही येवोत, अर्ध्या रात्री उठून ह्या माऊलीने स्वयंपाक करून त्यांना खाऊ घातले. तिच्या किरकोळ देहयष्टीत जणू हत्तीचे बळ संचारलेले असे. सदा उभी, सदा चूल पेटलेली, आळस नाही, उबग नाही, उसंत नाही. ग काकी यांना सगळे भूमिगत क्रांतीकरक आदराने भवानी माता असे पण म्हणत. त्यांच्या सगळ्यात मोठ्या मुलीच नाव कमल होते, तिला सगळे बेबी असे म्हणत. इंग्रज पोलिसांना संशय येऊ नये म्हणून स्वातंत्र लढ्याच्या कामात लहान बेबीचा पण ते सहभाग करून घेत.

ग काकांच्या वाड्यात क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, नागनाथ नायकवडी, डॉ. उत्तमराव पाटील व त्यांच्या पत्नी सौ. लीलाताई पाटील, व्यंकटेश माडगुळकर, श्रीमती अरुणा असफअली यांसारखे अनेक क्रांतिकारक वास्तव्य करून गेले, पण ह्याची इंग्रजांना कधीही कल्पना आली नाही. ग काका हे नाना पाटील यांच्या पत्री सरकार मधील त्यांचे सहकारी पण होते. ग काका आधी पासून स्वातंत्र लढ्यात उतरले होते. सगळे क्रांतिकारक हक्काने आणि विश्वासाने चिखलगोठण येते लपायला येत असत. असेच करत करत ते नाना पाटील ह्यांच्या प्रती सरकार मध्ये सहभागी झाले. संपूर्ण गाव हे प्रती सरकार च्या भूमिगत क्रांतीकारकांना मदत करत असे. पण याची जराशीही कुणकुण पोलिसांना लागली नाही. एके दिवशी नाना पाटील यांच्या विरुद्ध वॉरंट निघाले. त्यांना अटक होणार म्हणून ते सातारा येथून निसटले. पण आता लपायचे कुठे हा विषय आला. त्यांचे एक साथीदार जी. डी. बापू लाड यांनी सुचवले, चिखलगोठण येथील गंगाधरपंत चिटणीस ह्यांच्या वाड्यात जाऊ. ते आपल्या चळवळी मधील आहेत, आणि त्यांचा वाडा आपल्यासाठी सुरक्षित आहे. म्हणून ते सुरवातीला २ ते ३ दिवसाठी ग काकांच्या वाड्यात येऊन लपले. आणि त्यानंतर हा वाडा त्यांचे हक्काचेच लपण्याचे ठिकाण झाले.

क्रांतिकारकांना पैशाची चणचण जाणवू लागली. नाना पाटील, त्यांचे सहकारी जी. डी. बापू लाड व नागनाथ अण्णा नायकवडी ह्यांनी इंग्रजांचा खजिना लुटायचा बेत ठरवला. या कटात ग काका पण सामील होते. मिरजेहून धुळ्याला एका ट्रेन मधून पगाराची रक्कम जाणार होती. ती ताकारी स्टेशन गेल्या नंतर लुटण्यात आली. ह्या लुटीची काही रक्कम ही चिखलगोठण येथे ग काकांच्या वाड्यात सुरक्षित ठेवायची ठरले. पेच असा पडला की तिथपर्यंत हा गठ्ठा न्यायचा कसा? त्यांनी ठरवले की लहानग्या बेबीला सोबत ठेवायचे आणि सामान तिच्या कडे द्यायचे, म्हणजे पोलिसांना संशय येणार नाही. त्यावेळेस बेबी इस्लामपूरला तिच्या आजोळी शिकायला पाठवली होती, कारण चिखलगोठण गावात तिचे शिक्षण नीट झाले नसते. ग काकांचे सासरे हे इस्लामपूरला सर्कल इन्स्पेक्टर होते. ते शिक्षणाच्या बाबतीत प्रचंड कडक शिस्तीचे होते. ग काका तडक इस्लामपूर येथे गेले आणि सांगितले की बेबीच्या आईला बरे वाटत नाहीये, २/४ दिवसात तिला भेटवून परत आणतो. ग काकांचे सासरे बेबीला सोडायला तयार नव्हते, पण सासूबाईंनी तिला सोडले. तेव्हा सासरे प्रचंड चिडले आणि बोलले पोरीचं शिक्षण नीट होऊ द्या, आता सोडतो परत नंतर सोडणार नाही. २ दिवस येऊन नाही झाले तर आले लगेच घ्यायला. ग काकांनी बेबीची कपड्यांची पिशवी घेतली आणि निघाले. इस्लामपूर येथून बसमध्ये बसले आणि जिथे लुटीच सामान ठेवले तिथे गेले. ती लूट बेबीच्या पिशवी सोबत दिली आणि ते चालत स्टेशनवर पोचले. चालत येताना बेबीला सांगितले होते, पिशवीवर लक्ष ठेव, कोणाला हात लावून द्यायचा नाही, आणि तुझ्या सोबत कोण आहे विचारले तर कोणी नाही म्हणून सांगायचे. रेल्वे स्टेशन जवळच्या एका हॉटेलमध्ये ते जेवले आणि ट्रेन आली तशी तिला ट्रेनमध्ये बसवले. ट्रेनमध्ये आधीच तिच्या समोर एक धनगर, आणि बाजूला एका साधू बसले होते. तिला तिथे बसवले, सामान अर्धे सीटखाली आणि अर्धे वर ठेवले. तिला सांगितले बस इथे, कुठे जाऊ नको आणि तुला जे काही सांगितले आहे ते सगळे नीट लक्षात ठेव. बाजूच्या लोकांना सांगितले की मी जाऊन येतो, पोरीवर जरा लक्ष ठेवा. आणि ते गेले ते परत आलेच नाहीत. बेबीला खेळायला भरपूर घुंगरू असलेला एक पैंजण दिला होता. त्यात ती रमून गेली. ताकारी स्टेशन आलं तस तिला तिथे उतरवून घेतलं. आणि आडवाटेने पुढचा पायी प्रवास सुरू झाला. खाणाखुणा झाल्या की काही माणसं येत. थोड्या अंतरावर ती माणसे त्यांना एका ठिकाणी सोडायची आणि वेगवेगळया वाटेने निघून जायचे. गावातून न जाता आड वाटेने जात असत कारण पोलीस मागावर असत. बेबी चालून किंवा पळून दमली की तिला कोणीतरी उचलून घेत. अशी मजल दरमजल करत एकदाचं चिलखगोठण गाठलं. तसे वाड्यात सगळे क्रांतिकारक रात्री अपरात्री यायचे. म्हणून हे सगळे रात्री आले त्याचे कोणाला आश्चर्य वाटले नाही. सगळ्यांना ग काकीनी गरमागरम भाकरी व भाजी करून जेवायला दिले. बेबीला अजून एक लहान बहीण होती लीला. दोघी जणी गप्पा मारत बसल्या. बेबी गंमत जम्मत सांगत होती. आई बाबा ओरडतील म्हणून त्यांनी झोपेचे सोंग घेतले, तेव्हा ग काकी काकांना विचारत होत्या, बेबीला मध्येच कसे काय आणले? काकांनी सांगितले तो दरोडा टाकला ना त्याची रक्कम कशी आणायची असा पेच पडला, म्हणून बेबीला घेऊन आलो. तात्या सोडत नव्हते पण ताईनी सोडले (तात्या म्हणजे काकींचे वडील आणि ताई म्हणजे आई). आणि तुला जे सांभाळून ठेवायला दिले आहे ना हे तेच आहे बर का. काकींना हे ऐकून बहुतेक काळजी वाटली असावी. त्या म्हणाल्या अहो ही पिशवी कुणी चोरली असती किंवा पोलीस आले असते आणि तिला दोन फटके देऊन तिच्या तोंडून वदवून घेतलं असतं तर? परत कृपाकरून तिला असल्यात घेऊ नका. अहो लहान पोर ते. ग काका म्हणाले, अग ती एकटी नव्हती कडेला इश्वर, नाथा, व्यंकू मामा ही सगळी आपलीच मंडळी होती. फक्त वेगळ्या रुपात. अशा प्रकारे ती रक्कम व्यवस्थित जागेवर पोहोचली. ही सगळे आपलीच मंडळी होती हे जेंव्हा बेबीला समजले तेंव्हा तिला सांगून ठेवले की हे कुठेही बोलायचे नाही, नाहीतर पोलीस तुझ्या बाबांना पकडतील, आणि जेलमध्ये टाकून फटके देतील, चालेल तुला? मग काय ती गप.

बेबी इस्लामपूरला आजोळी शिकायला असताना त्यांच्या घराच्या मागेच पोस्ट ऑफिस होतं, आणि त्यासमोर एक मैदान होतं. एक दिवस तिथे बेबी आणि तिचा शरदमामा खेळत होते. शरदमामा फक्त चार वर्षांनी मोठा. पोस्टासमोर एकजण नुसता रेंगाळत उभा होता. बेबी मामाला म्हणाली, अरे अजून ते काका बघ तिथेच बोलत थांबलेत. तो म्हणाला ते तुला नाही कळायचं. पुढे तो काहीच बोलला नाही, पण तो घाबरला होता. तिला कळेना तो का घाबरला? तसे तिथे घाबरण्याजोगे काहीच नव्हते. तेवढयात मोठा स्फोट झाला आणि ते काका आख्खे पेटले. मामा बेबीला घेऊन घरात पळत आला आणि आईशी काहीतरी बोलला. नंतर बेबी जेव्हा सुट्टीत गावी आली, तेव्हा तिने आईबाबांचं बोलणं ऐकलं. त्याच नाव शांताराम शिवराम अस काहीतरी होतं, तो पोस्टावर बॉंब टाकायला गेला होता आणि तिथला पोलीस हालेपर्यंत थांबला होता. त्याच्याकडे टाईम बॉंब होता, तो त्याच्या खिश्यातच फुटला आणि भाजला. बरं झालं तिथ इश्वरी होता, त्याने कुठूनतरी घोंगडी आणली आणि त्याला गुंडाळलं. खूप भाजला होता, पण औषध केलं, मलम लावलं.

इस्लामपूरला शाहीर निकम आले की मुलांना पोवाडे म्हणून दाखवायचे. ते जेंव्हा बेबीच्या आजोबांनी ऐकलं तेंव्हा ग काकांच्या अपरोक्ष त्यांनी बोलायला सुरवात केली, असले पोवाडे म्हणायचे असतील तर माझ्या घरी चालायचे नाही. तेव्हापासून शाहीर निकम आले की बेबी आणि शरदमामा त्यांच्या सोबत पत्र्यावर जाऊन पोवाडे ऐकत आणि गात बसायचे. पोवाडा म्हणायला हे दोघे पण शिकले. जीजाने पण (उत्तमराव पाटील यांची बहिण) “हे हरामखोर सरकार नाही जिंवत आम्ही ठेवणार” अशा प्रकारची गाणी, आणि “खानदेशी गाव टुमदार नाव, नंदुरबार येथे सुकुमार सोळा वर्षाचा होता एक बाळ, शिरीष नावाचा लडीवाळ, परी गोऱ्यांना भासला काळ, जी s s s जी s s” ह्या प्रकारचे पोवाडे शिकवलेले होते. २/३ वेळा कुंडल, पलूस किंवा असे कुठे शाहिरांचे कार्यक्रम असले, आणि पोलिसांना बातमी लागली की शाहिरांना अर्ध्या कार्यक्रमा मधून चहाला म्हणून बाहेर नेत असत. आणि ते येईपर्यंत ह्या मुलांना गाणी, पोवाडे म्हणायला सांगत.  पोलीस आले की रागारागाने बघत. पण लहान मुलांना काही करता यायचं नाही. म्हणायचे परत असली गाणी म्हणालात तर पकडून नेऊ, तिला पण नेऊ. शाहीर निकम काही परत यायचे नाहीत. त्यांना बहुतेक पळवून नेलेल असायचं.

एकदा गावात प्लेगची साथ आली होती म्हणून संपूर्ण चिटणीस कुटुंब आणि गावातील लोक आपापल्या शेतात राहायला गेले होते. तेव्हा उत्तमराव पाटील आणि त्यांचे काही सहकारी पण तिथेच होते. तेवड्यात बहिर्जी नाईक (प्रती सरकार मधील एक तुकडी) पथकातील एक खबरी आला आणि त्यांने निरोप दिला, आज रात्री नाना पाटील येणार आहेत, त्यांना लपवायचे आहे. निरोप सांगून तो निघून गेला. आता मोठी पंचाईत, २/३ दिवसात पोलीस पार्टी येणार, लपवायचे कुठे असा प्रश्न पडला. गावात तर प्लेगची साथ आहे मग? मग ग काकांनी जोखीम घेतली आणि वाड्याच्या एका अडगळीच्या खोलीत त्यांना ठेवले. आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून बाहेरचे सगळे दरवाजे उघडे ठेवले. बरोबर ३/४ दिवसांनी पोलीस पार्टी आली तेव्हा संपूर्ण गाव रिकामे होते. गावात कोणीच नाही बघून ते ग काकांच्या वाड्यावर आले. दरवाजे सताड उघडे होते. पोलिसांनी वाड्यात प्रवेश केला, सगळा वाडा फिरून बघितले, कोणीच दिसले नाही. थेट ते माजघरापर्यंत गेले पण कोणीच दिसले नाही. शेवटी उलट पावली परत गेले. माजघराच्या जवळच एक अडगळीची खोली होती, ती खोली फक्त त्यांनी बघितली नाही. नाहीतर नाना नक्की पकडले गेले असते. ग काका काकी रोज लपतछपत वाड्यात येवून नाना पाटील ह्यांना जेवण देत असत.

एकदा ग काका व काकीची जेवणे झाली होती आणि ते झोपायला जात होते, तेवढयात दारावर थाप पडली. काकींनी दार उघडले आणि खाणाखुणा झाल्यावर सर्वाना घरात घेतले. जवळ जवळ १० ते १५ जण होते. परत काकींनी त्यांच्यासाठी स्वयंपाक केला आणि जेवायला वाढले. त्यातल्या जी. डी. बापू लाड ह्यांच्याकडे बंदूक होती. तेवढ्या थोड्याशा वेळात त्यांनी बेबी आणि लीला (ग काका व काकी यांच्या मुली) ह्यांना बंदूक धरायला व नेम लावायला शिकवायचा प्रयत्न केला. पण बंदुकीचे वजन जास्त असल्याने त्यांना दोन्ही हातानी उचलून घेणे सुद्धा जमत नव्हतं. काकींनी सगळ्यांना गरम गरम भाकरी दिली आणि जेवणानंतर सगळे झोपायला गेले. उजाडायच्या आत सगळे निघून पण गेले. ग काका पण सोबत गेले आणि २ दिवसांनी परत आले. त्यांनी सांगितले लीलाताईंना पुण्यात अटक झाली आणि पुण्याच्या येरवडा जेलमध्ये ठेवले होते. त्यांनी आजारी पडण्याचे नाटक केले आणि त्यांना दवाखान्यात भरती केलं. तिथून त्यांना सायकलवरून पळवून आणत आहेत. वाटेत सगळ्या सायकलवाल्या जोडप्यांची तपासणी सुरु आहे. आणि त्यात लिलाताईंनी कपाळाला गोंदवले होते ते काढून टाकले तरी ते दिसत आहे. पुण्यावरून थेट कुंडलला आणून लपवायचे आहे. त्यांना लपवून ठेवणे पण धोक्याचे आहे. तेव्हा काकी म्हणाल्या बेबीला त्यांची लेक म्हणून त्यांच्या सोबत ठेवू, म्हणजे लेकुरवाळी म्हणून कोणाला संशय येणार नाही. काका काकी बेबीला घेऊन कुंडल येथे आले. तिथे आल्यावर बेबीला सांगितले, आजपासून इथे असेपर्यंत लिलाताईंना तू आई म्हणायचे आणि मला काकी. लीलाताई सांगत असत की आम्ही सुट्टीसाठी आलोय, आणि बेबी सांगत असे ही माझी आई आहे आणि ह्या काकी. (लीलाताई आई व खरी जन्मदाती आई ही काकी). पोलिसांना कोणताही संशय आला नाही, आणि काही दिवसांतच लीलाताई आपल्या गावी परत गेल्या.

१९४२ ला ‘चले जाव’ आंदोलन सुरू झाले. सगळ्या भूमिगत क्रांतिकारकांच्या अंगात स्फुरण चढलं आणि त्वेषाने परत इंग्रजांच्या विरुद्ध बंड सुरु केले. पत्री सरकारने गावातील अनेक टगे, गावगुंड, सरकारी हस्तकांना, फितुरी पाटलाला देशद्रोही पणाचे प्रायश्चित दिल्याबरोबर गोरे सरकार चवताळून उठले. त्यांच्या जिव्हारी हा टोला होता. एवढया संरक्षणात असलेल्या पाटलाला भूमिगतांनी शिक्षा करायची म्हणजे काय? पाटलाचे हातपाय तोडले नाहीत, तर सरकारचे हातपाय तोडल्या सारखी सरकारची अवस्था झाली. सातारचा गोरा डी. एस. पी. गिल्बर्ट (सिंधमधील हुरांचे बंड मोडून काढणाऱ्या या क्रूरकरम्याला साताराचे बंड मोडून काढण्यासाठी मुद्दाम नेमले होते.) चवताळून उठला. शिकारीसाठी रान उठवावे तसे गावच्या गाव झोडपायला सुरवात केली. मूर्तिमंत क्रूरपणा गिल्बर्टने धारण केला. एके दिवशी गिल्बर्टला कोणी तरी खबर दिली की गावचा इनामदार गंगाधर चिटणीस हेच ग काका आहेत आणि ते भूमिगत क्रांतिकारकांना वाड्यात लपून ठेवतात व मदत करतात. तसेच त्यांना संपूर्ण गाव मदत करतो. हे समजल्यावर तिथले इंग्रज अधिकारी प्रचंड चिडले आणि संतापले. त्यांनी संपूर्ण चिखलगोठण गावाला पहाटेच वेढा दिला. गावातला माणूस बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस आत येणार नाही असा बंदोबस्त केला होता. गावाप्रमाणे गावचे इनामदार गंगाधर चिटणीस हे या भूमिगतांचे पुढारी होते म्हणून प्रथम त्यांच्या वाडयाला पोलिसांचा मजबूत वेढा घातला होता, मुंगी सुधा शिरणार नाही असा. ग काकांना निसटायची संधी पण मिळाली नाही. सगळे कसे अचानक घडले. ग काकांना अंथरूणातून ओढून काढले व चावडीच्या पटांगणात आणले. त्या आधीच पोलिसांनी गावातील प्रत्येक घरातील मोठ्या व्यक्तीला पकडून चावडी वर आणले होते. गावातील झाडून सारी माणसे पकडून आणली. एकालाही बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्या सगळ्या लोकांना पोलिसांसमोर बसवले. गोऱ्या डी. एस. पी. ने पिस्तुल काढले, तो थरथरत होता, रागाने लालबुंद झाला होता. तोंडातून शिव्यांची लाखोली वाहत होता. ‘सरकार को तुम लोग क्या समज रहे है, जो सरकारला हात लावील त्याचा मुडदा पाडून टाकू. गोळी मारू. हा साला इनामदार, बेईमान हरामखोर, आमचेच खातो व आमच्यावर उलटतो काय, उठाव उसको. हुकुम निघताच ग काकांना चावडीच्या पटांगणात दोघातिघा अधिकाऱ्यांनी खेचून आणले आणि त्यांना अंगठे धरून ओणवे उभे केले, आणि पाठीवर काठ्यांचा मारा सुरु केला. काकांनी हुं कि चुं केले नाही. ग काका म्हणत होते “चरखा चला चला के लेंगे, स्वराज्य लेंगे’, ‘चलाव लाठी चलाव दंडा | उडायेंगे अपना झंडा’, ‘मरेंगे, लेकीन पिछे नही हटेंगे. हे ऐकल्यावर गिल्बर्ट जामच चवताळला आणि त्याने आदेश दिले अजून झोडपून काढा ह्यांना. शेवटी त्यांची ताकद संपली आणि ते खाली कोसळले, ते जमिनीवर आदळेपर्यंत गुरासारखा मार चालला होता. गावच्या पोलीस पाटील व इतर दोघाचौघा गावप्रमुखांना पण तसेच झोडपण्यात आले. नंतर मेंढ्या ठोकतात तसे जमलेल्या गावातील सर्वाना भोवताली असलेल्या पोलिसांनी झोडपून काढले. डी. एस. पी. गिलबर्टची छडी सपासप बसत होती. चोपदारांचे मारून मारून हात दुखायला लागले तेव्हा कुठे हे अघोरी कृत्य थांबले. पण गिल्बर्टच्या क्रूरपणाचा परिणाम काय झाला, 'केला जरी पोत बळेची खाले | ज्वाला तरी ते वरती उफाळे'. मार देऊन, अब्रू घेऊन साधले काय? तर  संपूर्ण चिखलगोठण गावातील बच्चा नी बच्चा भूमीगतांचा पाईक बनला. गावातील उरली सुरली भीतीही नाहीशी झाली. सबंध गावाची एकजूट झाली. गावच्या इनामदारच्या नेतृत्वखाली सारा गाव भूमीगतांचा बालेकिल्ला झाला. गोऱ्या डी. एस. पी. च्या दडपगिरीने संपूर्ण गावाला पोलादी पाणी चढवले, त्यामुळे संपूर्ण गाव देशप्रेमाने पेटून उठला. चिलखगोठण गावाने भूमिगत क्रांतीकरकांची सेवा केली, त्यासाठी फार कष्ट सोसले. त्यागाने व जिद्दीने पूर्ण चिखलगोठण गाव इंग्रज सरकारच्या विरोधात गेला आणि तेथील इनामदार ग काका हे त्यांचे सरदार बनले.

हां हां म्हणता अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला. सगळीकडे आनंदीआनंद झाला. चिखलगोठण गाव पण आनंदात होता. प्रत्येक घराबाहेर रांगोळ्या काढल्या होत्या. घराघरात गोडधोड बनवलं होतं. सगळी पोरं झेंडे घेऊन पोवाडे व गाणी म्हणत गावभर पळत होती. चिटणीस वाडा पण फुलांनी सजवला होता. स्वातंत्र्यानंतर ग काका व काकी शेती करायला लागले. औषधांबद्दल माहिती होती म्हणून अडीअडचणीला काकी गरजूंना औषध पण द्यायच्या. असेच त्यांचे पुढचे दिवस मजेत चालले होते. गावात काही सोयी सुविधा आणायच्या हेतूने काकांची धडपड असायची. गावात शाळा, लाईट, पाणी येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले. तेवढ्यात नथुराम गोडसे या ब्राम्हणाने गांधीजींची हत्या केली आणि संपूर्ण भारतात आगडोंब उसळला. काही समाजकंटकांनी (गांधी समर्थक अहिंसेच्या पुजाऱ्यांनी) ब्राम्हणाची घरे / वाडे जाळली, त्यात ग काकांचा वाडा पण खाक झाला. ग काका हे ब्राम्हण नसून सीकेपी होते. पण त्यांच्याच काही आप्तांनी हे ब्राह्मणाचे घर आहे म्हणून त्या लोकांना सांगितले, आणि वाडा जाळायला लावला. महाराष्ट्र सरकारने ताम्रपट व सन्मानपत्र देऊन ग काकांचा गौरव केला खरा, पण स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना खूप कष्टात दिवस काढावे लागले. सांगलीचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने ग काकांनी कळवा ग्रामस्थांची सुद्धा वेळोवेळी निःस्वार्थ मदत केली. आता ग काका आणि काकी हयात नाहीत, पण त्यांच्या संस्कारांमुळे, त्यांच्या पुढच्या पिढ्या आपापल्या क्षेत्रात सन्मानाने आणि स्वाभिमानाने कार्यरत आहेत.

आजी, आजोबा आणि आई ह्यांना, आणि त्यांच्यासारख्या असंख्य अज्ञात क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन.

|| वंदे मातरम ||


आजोबा आणि आजी


आभार 

सी.के.पी. टाईम्सच्या स्वातंत्र्यदिन अंकासाठी हा लेख लिहिण्यासाठी माझा मामेभाऊ तेजस चिटणीस ह्याने बरीच मेहेनत घेतली. त्याने अनेक संदर्भ गोळा केले. माझा मामा जीवन चिटणीस आणि मामी मंजुषा चिटणीस ह्यांनी पण त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती पाठवली. ह्या तिघांना आणि इतर मावस भावंडांना त्यांनी वेळोवेळी केलेल्या सुचनांबद्दल धन्यवाद. ह्या लेखाचे पूर्ण क्रेडिट मी तेजसला देतो. ह्या लेखास साचेबद्ध करण्याचे आणि फिनिशिंग टच देण्याचे काम फक्त मी केले आहे.


संदर्भ व आधार

१) आईच्या हस्तलिखित आठवणी.
२) भारत क्रांती, शिरपूर. २८ मे १९६५ मधील लेख- 
     १९४२ च्या लढ्याच्या गोष्टी - लेखक, प्रकाशक, संपादक डॉ. उत्तमराव पाटील.
३) पत्री सरकार - लेखक व. न. इंगळे.
४) दै. दलितनारा - अॅड. हरिष खोब्रागडे, संपादक अॅड. पं. कृ. भडकमकर.
५) क्रांतिपर्व - डॉ. उत्तमराव पाटील

Monday, May 11, 2020

घरवापसी

१० मे, २०२०. आज खरे तर आम्ही परतीच्या प्रवासासाठी विमानात बसलो असतो. पण ही कोरोना महामारी पचकली, आणि तिकिटे रद्द करून इथेच कॅनडा मध्ये मुक्काम करून बसलोय. तरी एक बरे आहे की आम्ही मुलाच्याच घरी आहोत. घरी वेळ घालवायला एक वर्षाची नात आहे. मधून मधून हवा बरी असली की इथले सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून फिरायला मुभा आहे.

आम्ही आलो त्यावेळेस इथे हिवाळा सुरू होता. विमानातून उतरलो तेव्हा सर्व घरे, रस्ते पांढऱ्या स्वच्छ बर्फाने आच्छादलेले होते. सुरुवातीला स्नोफॉलचे एवढे कौतुक वाटायचे की भुरुभुरू सुरुवात झाली तरी मी चेकाळल्यासारखा फोटो काढत होतो. नंतर नंतर जसजसा जोर वाढू लागला तेव्हा इथे लोक कसे काय राहू शकतात अशी शंका वाटू लागली. सूर्य पाहायला मिळाला की इकडची लोकं खुश का होतात हे इथे अनुभवायला मिळाले. प्रसन्न आणि दीपाली कामावर निघाले की काळजी वाटायची. पण त्या दोघांना ह्याची सवय होती, आणि ते निर्धास्त होते. एका शनिवारी एवढा हिमवर्षाव झाला, की रस्त्यावर जवळजवळ दिड ते दोन फुटांचा थर साठला होता. आमचा भाचीकडे जायचा प्लॅन होता तो रद्द करून घरात थांबावे लागले. मी ह्या बर्फात, परत कधी बघायला मिळेल ना मिळेल ह्या भावनेने, मस्तपैकी घराबाहेर जाऊन त्या वातावरणाचा अनुभव घेतला. संपूर्ण रस्त्यावर मीच एकटा वेड्यासारखा हिमवर्षावातफोटो काढत उभा होतो. मजा आली. दुसऱ्या दिवशी भाचीकडे गेलो तेव्हा रस्त्यात इतके मनोहर दृश्य होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरा स्वच्छ बर्फ. झाडांवर अधून मधून घरंगळलेला उरलेला बर्फ. इथे एक छान आहे, बर्फ पडला की एक तासाच्या आत मुख्य रस्त्यांवरचा बर्फ बाजूला काढला जातो, आणि एक प्रकारचे मीठ रस्त्यांवर पसरण्यात येते जेणेकरून उरलेला बर्फ वितळून जाईल. आडरस्ते चोवीस तासाच्या आत मोकळे केले जातात. सर्व घरमालकांनी सुद्धा चोवीस तासांत आपापल्या घरासमोरचे पादचारी मार्ग बर्फ काढून स्वच्छ करायचे असतात. त्यामुळे रस्त्यावरचे अपघात नगण्य असतात.

कधीकधी मी एक वर्षाच्या एझलला घेऊन सुद्धा बर्फात चक्कर मारून आणायचो. लाललाल व्हायची, पण मजेत असायची. एक दिवस तर ताशी ४८ किमी वेगाने वारे व्हायला लागले. त्यात स्नो फॉल चालू होता. घरात बसून वादळी वाऱ्यात गरागरा फिरत जाणारे हीमकण बघायला मजा येत होती. पण अचानक घरातली हीटींग सिस्टीम बिघडली. आणि घरातले तापमान १७ च्या वर जाणेच बंद झाले. मग प्रसन्नने भल्या सकाळी जाऊन पोर्टेबल हिटर आणले आणि दोन दिवस भागवले. तोपर्यंत मुख्य हिटर बदलून टाकला. ह्या दिवसांत, हिमवर्षावात बाहेर फिरायला जाणे तसे खूपच अवघड होते. तरी प्रसन्न दीपाली गाडी काढून, कधी एखाद्या मॉलला, किंवा एखाद्या बागेत फिरायला घेऊन जायचे. कधी इथल्या हॉटेल मध्ये जेवण व्हायचे. एका रविवारी असेच स्क्वेअर वन ह्या मॉलमध्ये दिवस घालवून घरी येता येता प्रसन्न म्हणाला, अजून सूर्यास्त व्हायला वेळ आहे आपण अजून दुसऱ्या कुठेतरी जाऊन येऊ. नायगारा फॉल इथून एक तासांवराच आहे, त्यामुळे त्याची गाडी नायगाराच्या दिशेने निघाली. नायागराला गाडी पार्क केली आणि उतरलो तर काय जबरदस्त थंडी होती. त्या थंडीत एझलला उतरवणे म्हणजे वेडेपणाच होता. त्यामुळे फक्त मी आणि सुजाता उतरून दहाच मिनिटे कुडकुडत धबधबा जवळून बघून आलो. परत यायचेच आहे तेव्हा नीट बघू म्हणून आम्ही लगेच घरी परतलो. पाच वाजता मिसिसागा वरून निघालो आणि तीन तासात नायगारा बघून परत. असेच एका संध्याकाळी लेक शोअर गार्डनला जाऊन आलो. लेक खूप मोठा, स्वच्छ, निळाशार. हवा थंड होती, पण छान मजा आली.

सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे चालू होत्या. मार्च मध्ये एझलचे डे केअर सुरू होणार होते. २२ मार्चला तिचा पहिला वाढदिवस जोरात करायची तयारी चालू होती. थोड्याच दिवसानंतर हिवाळा संपला की वसंत ऋतू मध्ये शनिवार रविवारला जोडून मुले सुट्ट्या घेणार होती, आणि मग खऱ्या अर्थाने कॅनडा दर्शन आणि खरेदी असे सुरू होणार होते. सुजाताचा १७ एप्रिलचा वाढदिवस नायगारा फॉल जवळ साजरा करायचा ठरले होते. एक आख्खा दिवस नायगारा फॉल जवळ फिरायचे, रात्री तिथेच एका हॉटेल मध्ये राहून रंगीत धबधब्याचे दृश्य बघायचे असा जबरदस्त प्लॅन होता. हॉटेल बुकीग पण झाले होते. अनुया, आमची भाची, आणि नूतन, सुजाताची बहीण, पण येणार होते. आणि ह्या कोरोनाने घाण केली. सगळे ठरलेले बेत धुळीस मिळवले. एझलची शाळा सुरूच झाली नाही. वाढदिवस घरातल्या घरात साजरा करावा लागला. कॅनडा दर्शन काय, घरातून बाहेर पडणे पण बंद झाले. फिरण्यावर मर्यादा आल्या. मुलांच्या पार्क्स बंद झाल्या. एझल घरात बसून वैतागली. मग प्रसन्नने बॅकयार्ड मध्येच लॉन आणले. एझलला वाढदिवस भेट म्हणून मिळालेली बास्केटबॉल आणि घसरगुंडी तिथे ठेवून स्वतःचेच पार्क तयार केले. त्या दोघांचेही घरात बसूनच ऑफिस काम चालू झाले. जसजसे दिवस पुढे जायला लागले, तसे आंतरदेशीय विमानसेवाही बंद झाल्या. आमची तिकीटे तर रद्द केलीच, पण व्हिसा मुदत वाढवावी लागते की काय अशी वेळ येऊन ठेपली. त्या दृष्टीने प्रसन्नचे प्रयत्न सुरू झालेत. आमची औषधे मे महिनाअखेर संपणार, त्याचा बंदोबस्त करावा लागला. भारतीय डॉक्टरचे प्रिस्क्रीपशन इथे चालत नाही. मग ठाण्याची डॉक्टर भाची पूजाकडून आमच्या औषधांचे जनेरिक प्रिस्क्रिपशन मागवले. आता प्रसन्न इथल्या त्यांच्या डॉक्टरकडून प्रिस्क्रिपशन घेऊन आमची औषधेआणणार आहे. मधूनमधून पुष्कर अमृता बरोबर बोलणे होते तेव्हा इथल्यापेक्षा तिकडची परिस्थिती किती भयावह आहे हे समजते. रुहीची सतत काळजी वाटत राहते.

पण काय करणार, आता अशा परिस्थितीत इथे रहायचेच आहे तर मग मजेत राहू ना. हळूहळू मोसम पण बदलायला लागलाय. हिवाळा संपून वसंत ऋतू सुरू झालाय. उणे सतरा डिग्री वरून तापमान अधिक १४ कडे झुकायला लागले आहे. पण सद्ध्या इथले सगळे विचित्रच चालू आहे. आज कडक उन, तर उद्या पाऊस. कधी कधी उन्हात पण बर्फ पडतोय. अधिक चौदा पर्यंत गेलेले तापमान परत उणे सहापर्यंत घसरले. पण एरवी हिवाळ्यात झाडे जी पार झडून गेली होती, त्याला आता पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. लोकांच्या घराबाहेर निरनिराळी फुलझाडे दिसायला लागलीत. तुलीप, लीली, चेरी ब्लॉसम अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलझाडांनी घरे, रस्ते नटू लागलेत. घरासमोरच्या बाजूला हिरवळ पसरू लागली आहे. पिवळी पिवळी जंगली फुले ह्या हिरवळीत फारच सुंदर दिसतात. सकाळी हवा बरी असेल तेंव्हा जरा फेरफटका मारून येतोय. संध्याकाळी एझलला घेऊन सगळेच जण चालून येतो. दिवसभर घरात बसून, घरातूनच काम करून सगळेच कंटाळलेले असतात, तेवढेच जरा पाय मोकळे होतात. आम्ही जर आज पुण्याला परतलो असतो, तर हा रंगीबेरंगी मोसम बघायला मिळाला नसता. पुढे पुढे तर म्हणे सगळे अजून खूप सुंदर दिसते. बघू, नशिबात असेल तर ते पण बघायला मिळेल, सर्व काही परिस्थितीवर अवलंबून आहे. घरी परतायची जशी ओढ आहे, तशीच इथले सौंदर्य बघायची पण उत्सुकता आहे. जसे देवाच्या मनात असेल तसे. बघू किती मुक्काम वाढतोय ते. तोपर्यंत ठरवलेय, आहेत ते दिवस मजेत घालवायचे. 

घरासमोर फक्त बर्फ आणि बर्फ

नायगरा फॉल अल्पदर्शन

वसंत ऋतूचे आगमन


Monday, March 23, 2020

एझलचा पहिला वाढदिवस

२२ मार्च २०२०. आज आमची धाकटी नात एझलचा पहिला वाढदिवस. 

जवळजवळ एक महिन्यांपासून तिच्या आई बाबांची तयारी चालू झाली होती. हल्लीच्या पद्धतीप्रमाणे वाढदिवसाची थीम काय ठेवायची, त्यासाठी डेकोरेशन कसे करावे लागेल, थीमला शोभेल अशा केकचं डिझाईन, त्या दिवशीचा ड्रेस आणि अनेक गोष्टींचं प्लॅनिंग झालं. पाहुण्यांची यादी तयार झाली. ई-इन्व्हिटेशन तयार झाले आणि सगळ्यांना व्हॉट्सअपवर निमंत्रण गेले. सगळ्यांचे आर.एस.व्ही.पी. आले. पाहुण्यांच्या संख्येप्रमाणे केकची ऑर्डर दिली. एका शनीवारी इथल्या ख्यातनाम इटालियन केटररकडे जेवायची ऑर्डर दिली. डेकोरेशन साठी लागणारे सामान वेगवेगळ्या दुकानातून आणून ठेवले. काही वस्तू ऑनलाईन मागवल्या, त्या पण वेळेत आल्या. रिटर्न गिफ्ट पण आणून ठेवल्या. प्लॅनिंग प्रमाणे सगळी तयारी पूर्ण झाली.

आणि माशी शिंकली. आयत्या वेळेस ह्या कोरोनाने सगळ्या उत्साहावर पाणी पाडले. सोशल डीस्टनसिंग, सेल्फ क्वारंटाईन ह्या सगळ्यांवर सरकारी फतवे निघाले. सोशल मीडियातून नवीन नवीन बातम्या यायला लागल्या. एक प्रकारचे भीतीचे वातावरण निर्माण झाले. लोकं घराबाहेर पडणे बंद झाले. एकमेकांच्या घरी येणेजाणे कमी झाले. न जाणो त्यांच्यामुळे आपल्याला, किंवा आपल्यामुळे त्यांना त्रास नको अशा प्रकारची धारणा निर्माण झाली. सर्व प्रकारचे कार्यक्रम, लग्न, मुंजी, वाढदिवस रद्द झाले, पुढे ढकलले गेले.

मंगळवारी रात्री प्रसन्न दीपालीने बराच विचार केला. आपण एवढ्या लोकांना बोलावले आहे, पण ह्या परिस्थितीत ते कितपत योग्य आहे, सगळे येतील पण कदाचित प्रत्येकाच्या मनात धाकधूक असू शकेल, अशा वातावरणात उत्साहाच्या ऐवजी फक्त कोरोनाचीच चर्चा होऊ शकेल. डोकं भणभणायला लागले, आणि शेवटी वाढदिवसाची पार्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना खूप वाईट वाटले, पण परिस्थितीनुसार तो अगदी योग्य होता. त्यानुसार सगळ्या निमंत्रितांना कळवून टाकले. सगळ्यांनी निर्णय योग्यच होता हे सांगून दिलासा दिला. आता वाढदिवसाला एझल सोडून आम्ही चौघेच राहिलो. नशीब आम्ही दोघे आजी आजोबा इथे होतो, नाहीतर फक्त आई अन् बाबा. वाईट वाटले पण ईलाजच नव्हता.

आपण चौघे तर चौघे, चौघांतच ठरल्याप्रमाणे सगळे करायचे ठरवले. आदल्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांनी मिळून व्यवस्थित डेकोरेशनची तयारी केली. सकाळी लवकर उठून आजीबाई स्वयंपाकाची तयारी करण्यात गुंतल्या. एझलचा ब्रेकफास्ट झाल्यावर आईबाबांनी तिला आंघोळ घालून झोपायला नेले. १० वाजता केक मिळणार होता. मी आणि प्रसन्न केक आणायला गेलो. मस्त भुरुभुरू स्नो फॉल चालू होता. वातावरण फारच छान होते, पण रस्ते एकदम रिकामे. इथले लोक सद्ध्या खूपच सावध झालेत. प्रसन्नने केक घेण्यासाठी बेकरच्या घराची घंटा वाजवली. त्या बाईने घरातून केक आणला, बाहेर एका स्टूलवर ठेवला, आणि प्रसन्नला घ्यायला सांगितले. इथली मंडळी किती सिरीयसली सोशल डीस्टनसिंग पाळतात ह्याचे हे एक उदाहरण. 

एझलची जन्मवेळ दुपारी १२.४५ ची. सव्वा बाराला आजीने आपल्या परंपरेप्रमाणे औक्षण केले. नंतर एझलचे पुण्याचे आजी आजोबा (दीपालीचे आई बाबा), डोंबिवली वरून पुष्कर काका, अमृता काकी, रूही आणि अमृताची आई, न्यूयॉर्क वरून एझलची पल्लवी मावशी, अशा सर्वांना फेसबुक मेसेंजरवर ग्रुप चॅटवर बोलावले. आणि बरोबर तिच्या जन्मवेळेवर केक कापायचा कार्यक्रम जोरदार टाळ्यांच्या आवाजात साजरा केला. सुरुवातीला वाढदिवसाला आपण चौघेच कसे ही भावना कुठल्या कुठे पळाली, आणि त्या कोरोनाच्या नाकावर टिच्चून घरच्या सर्व मंडळींबरोबर आम्ही एझलचा वाढदिवस साजरा केला.

बर्थडे गर्ल

आजी कडून औक्षण

फेसबुक मेसेंजरवर ग्रुप चॅट

आई बाबा आणि एझल

हॅपी बर्थडे एझल

Thursday, March 19, 2020

आमच्या नातीचा शाळेचा पहिला दिवस

मंगळवार, १७ मार्च २०२०. आज आमची नात एझलचा शाळेचा (डे-केअरचा) पहिला दिवस. आम्ही पुण्याला परतण्याआधी एझलला सवय व्हावी म्हणून सुरुवातीला आठवड्यातून दोनच दिवस डे-केअरध्ये ठेवायचे ठरले. प्रसन्न आणि दीपाली गेले दोन तीन दिवस तिच्याच कपड्यांची, स्वेटर, शूज, डायपर वगैरे आणायच्या गडबडीत होते. सध्या कॅनडामध्ये कोरोनाच्या साथीमुळे सगळ्यांना घरून काम करण्याचे आदेश आले आहेत. सकाळी एझलला सोडून परत घरी यायचे, आणि ऑफिसच्या कामाला लागायचे म्हणून रात्रीच लिस्ट प्रमाणे सर्व बॅग भरून तयार ठेवली.

आज सकाळी सकाळी बिचारीला लवकर उठवले. तिचे आवरून, दूध पाजून, तिची बॅग तपासून तिचे आई बाबा तयार झाले. आजीने दृष्ट लागू नये म्हणून तिटाचा एक ठिपका नातीच्या गालाच्या मागे लावला. अजून तिला बोलता पण येत नाही, त्यामुळे तिला आपण काय बोलतो हे कळते की नाही हे समजायला काहीच मार्ग नाही. पण तरीही शाळेत रडू नको, नीट खेळ वगैरे चार उपदेशाच्या गोष्टी विनाकारण सांगून झाल्या.  पहिला दिवस म्हणून आम्ही कौतुकाने तिला टाटा बाय बाय केले, ती पण भूर्र जायला मिळते असे वाटून आनंदाने तयार झाली,  आणि आई बाबांबरोबर शाळेसाठी निघाली.

शाळेत पोचल्यावर तिथले वातावरण एकदम वेगळे होते. नेहमी मुलांचा कलकलाट चालू असतो, तर आज सगळ्या खोल्या आतून बंद होत्या. येणाऱ्या प्रत्येक मुलाचा ताप तपासून, सर्दी पडसे वगैरे काही नाही ना हे बघून आत घेतले जात होते. एझलचा पहिला दिवस होता म्हणून तिला घेऊन तिचे आई बाबा शाळाप्रमुखांकडे गेले. दार ठकठक केल्यावर आधी आतून विचारणा झाली की तुम्हाला कोणाला सर्दी पडसे नाही ना, किंवा कोरोनाची काही लक्षणे नाहीत ना. (लक्षणे असून देखील आपल्या मुलाला कोणी सोडायला येईल असे ह्यांना वाटलेच कसे हा प्रश्न वेगळा). नाही म्हटल्यावर दार उघडले आणि ह्यांना आत घेतले.

हाय हॅलो झाल्यावर प्रमुखांनी सांगितले की आजच खाजगी शाळा सुद्धा बंद ठेवण्याचा राज्याच्या पंतप्रधानांचा आदेश येणार आहे. तुम्ही आपल्या मुलीला इथे ठेवलेत तरी थोड्याच वेळात तिला घरी घेऊन जायला तुम्हाला परत यावे लागेल. त्यापेक्षा तुम्ही तिला आत्ताच घेऊन गेलात तर जास्त सोयीस्कर ठरेल. नशीब एझलला अजून काही कळत नाही, त्यामुळे ती हिरमुसली किंवा आनंदली वगैरे प्रकार झाला नाही, पण आई बाबांना मात्र थोडे वाईट वाटले. अर्थात शाळेत नेताना एक प्रकारची धाकधूक होतीच की तिथे काही इन्फेक्शन वगैरे होणार नाही ना, त्यातून सुटका झाली. आणि जगातील कुठल्याही मुलाचा झाला नसेल असा आमच्या एझलचा शाळेचा पहिला दिवस पार पडला. आता हे कोरोना प्रकरण आवाक्यात येईपर्यंत बिचारीची शाळा घरीच.

गो अवे कोरोना गो अवे...

Thursday, January 16, 2020

पुणे ते कॅनडा - एक अविस्मरणीय प्रवास

मुंबई विमानतळाबाहेर

८ जानेवारी २०२०, भल्या सकाळी पावणे तीन वाजता ब्रिटिश एअरलाईन्सच्या विमानाने मुंबई विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण केले. प्रसन्नकडे टोरोंटोला जाण्यासाठी व्हाया लंडन ही फ्लाईट बुक केली होती. एक डुलकी झाल्यावर गरम गरम चिकन पास्ता आला. तो खाऊन झाल्यावर आमचा टाईम पास सुरू झाला. समोरच्या स्क्रीनवर सिनेमे, गेम्स बरेच काही होते. काही वेळाने ते पण बोअर झाले. मग आमचे फ्लाईट ट्रॅकिंग सुरू झाले, आता विमान कुठल्या प्रदेशावरून चालले आहे, लंडनला पोचायला किती वेळ आहे वगैरे. डुलकी लागली तेंव्हा गल्फ प्रदेशावरुन विमान चालले होते. आणि आता जाग आली बघतो तर ट्रॅकिंग सिस्टिम बंद होती. थोड्याच वेळात कॅप्टनची अनाउन्समेंट चालू झाली. मी झोपेत असल्यामुळे नीट लक्ष दिले नाही. पण जेव्हा लँडिंग सुरू झाले तेव्हा बाहेरचा एअरपोर्ट खूपच लहान वाटला. काहीतरी गडबड असावी अशी शंका आलीच. विमान थांबले आणि कॅप्टनने प्रवाशांबरोबर संपर्क साधला. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान मार्ग बदलून अथेन्सला उतरविण्यात आले आहे. उद्या सकाळी ह्याच विमानाने आपण लंडनला जाऊ. त्यासाठी सकाळी साडे सहाला सर्वांना हॉटेलवरून पिकअप केले जाईल.

आयला, हा काय घोळ, आता पुढे काय, पुढच्या कनेक्टींग फ्लाईटचे काय. आमच्यासारखे अगदी मोजकेच सोडले तर बाकी सर्व कामानिमित्त प्रवास करणारे होते. त्यांच्या अपॉईंटमेंटचे बारा वाजले होते. बऱ्याच जणांना लंडनहून इतर देशांना जायचे होते. सगळेच गोंधळाचे वातावरण होते. बऱ्याच वेळाने आम्हाला विमानातून उतरवले आणि एअरपोर्ट लाउंज वरील एका छानशा कॅन्टीनमध्ये नेऊन बसवले. खायची, प्यायची, वॉशरूम ची सोय करून दिली. मुख्य म्हणजे वाय फायची सोय होती, त्यामुळे लगेच मुलांशी कॉन्टॅक्ट करता आले. पुष्कर जागाच होता, पण प्रसन्न दीपाली गाढ झोपेत होते, त्यांना उठवले. दोघांनाही परिस्थिती सांगितली. अमृता बरोबर पण बोललो. सगळे काळजीत होते. आम्ही सुरक्षीत आहोत हे ऐकून ते निवांत झाले. प्रसन्न सकाळी एअरलाईन्स कडे चौकशी करणार होता. पुष्करने इंटरनेट वर नक्की काय बातमी आहे हे पाहून आम्हाला अथेन्सला आलो हे किती बरे झाले हे सांगितले. 


अथेन्सच्या एअरपोर्ट लाउंजमधून सुंदर दृष्य 


झाले असे होते की एक युक्रेनियन विमान तेहरान विमानतळावरून उड्डाण केल्याबरोबर पाडण्यात आले. त्यात बरेचसे इराणी प्रवासी होते. ही घटना समजल्यावर पुढील धोका ओळखून ब्रिटिश एअरवेजने नेहमीची हवाई पट्टी बदलून विमान अन्य मार्गाने लंडनला नेण्याचे ठरवले. मार्ग बदलून विमान वळले, आणि थोड्याच वेळात, वीसेक मिनिटात इराणने अमेरिकी सैनिकी तळांवर गोळीबार केला. ही बातमी समजल्यावर मी ब्रिटिश एअरवेज आणि देवाचे मनोमन आभार मानले. त्यानंतर खरे तर ब्रिटिश एअरवेजचा अथेन्सला फ्युएल भरून लगेचच उड्डाण करायचा बेत होता. पण मार्ग बदलून अथेन्सला पोचण्यात एवढा वेळ गेला की विमानातील क्र्यूच्या वेळेची मर्यादा खूपच लांबली गेली. त्यामुळे विमान एक दिवस अथेन्सलाच थांबवण्यात आले. एरवी माझी खूप चिडचीड झाली असती, पण विमानातील क्र्यूच्या ड्युटिजचा खडतरपणा, अमृताची जी दमछाक होत असते, त्यामुळे मला चांगलाच माहीत होता. म्हणून बीपी नॉर्मल ठेवून मी शांतपणे पुढील प्रवासाची वाट पहात बसलो.

आता इकडे अथेन्स विमानतळावर एवढ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये जागा मिळवणे अवघड झाले होते. आणि बहुधा ट्रान्झिट व्हिसा मिळणे पण अशक्य झाले असावे. म्हणून मग एअरलाइन्सने अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली. ज्यांच्याकडे शांजेन व्हिसा होता, त्यांची हॉटेल मध्ये सोय करून पाठवण्यात आले. नंतर ज्यांची लहान मुले होती त्यांना दुपारी दोनच्या फ्लाईटने लंडनला पाठवण्यात आले. आता मला आपले काय ह्याची काळजी वाटायला सुरुवात झाली. फक्त आम्ही दोघेच नाही, तर बरोबर धाकटी मेव्हणी पण होती. काहीही झाले तरी तिला आमच्या बरोबरच ठेवा असे त्यांना विनवून सांगितले. त्यांनी विचारले की उद्या सकाळी नऊ वाजता एअर कॅनडाची टोरोंटोला जाण्यासाठी एक फ्लाईट आहे, त्याने तुम्हाला पाठवले तर चालेल का? मला काय, कसेही करून घरी पोहोचणे महत्त्वाचे होते. मी लगेच होकार दिला. अशाच प्रकारे त्यांनी अनेक एअर लाईन्स बरोबर कॉन्टॅक्ट करून शक्यतो बऱ्याच जणांची सोय केली. आमच्याकडुन पासपोर्ट आणि बॅगेज स्लिप्स घेतल्या. हळू हळू एकेकाला नवीन बोर्डिंग पासेस आणि बॅगेज स्लिप्स देणे चालू झाले. इकडे प्रसन्न ब्रिटिश एअरलाईन्सच्या साईटवर अपडेट बघत होता. तिथे त्याला आमच्या पुढच्या प्रवासाचे वेळापत्रक कळले, आणि त्याने ते आम्हाला लगेच कळवले. एअरलाईन्सच्या साईटवर अपडेट झाले म्हटल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मग एकेकजण गप्पा मारायला लागला. त्यांना सांगितले साईट वरचे अपडेट बघा, म्हणजे तुमची पुढची काय सोय खाली आहे ते कळेल. अशा प्रकारे गप्पा मारत, खातपीत, एअर पोर्ट लाउंजवर चक्कर मारत वेळ घालवत बसलो.

जेवढे शक्य होते तेवढ्या सर्वांची सोय झाली. पण काही तरुण मुलांना कुठलीही फ्लाईट मिळू शकली नाही, किंवा कुठेही हॉटेल मध्ये पाठवणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांना सांगण्यात आले की आजची रात्र इथेच एअरपोर्ट वर झोपून काढावी लागणार, आणि उद्या सर्वांना लंडनला नेण्यात येईल. अरे बापरे, बिचारे. तरुण होते म्हणून काय झाले, रात्रभर सोफ्यावर झोपायचे म्हणजे कटकटच ना. पण त्यांची तयारी होती. आणि बहुतेक मुलांनी ऑनलाईन काम करायला सुरुवात पण केली होती. ब्रिटिश एअर लाईन्सचा ऑफिसर काहीही न खातापिता अखंड फोनवर सगळ्यांची सोय करण्यात मग्न होता. ज्यांची सोय झाली नव्हती त्या सर्वांना अतिशय शांततेने उत्तरे देत होता. आपल्याकडे अशी परिस्थिती असती तर काय झाले असते असे चटकन मनात येऊन गेले. खेकसाखेकसी, आरडाओरडा, उद्धटपणा, उपकार करतोय ही भावना ह्याचा कुठे लवलेशही नव्हता. आतापर्यंत बऱ्याच जणांना पुढचा बोर्डिंग पास मिळाला होता. आमची पावणे सातची फ्लाईट होती, पण आमचा बोर्डिंग पास अजून हातात आला नव्हता. त्या ऑफिसरला विचारले की एकच उत्तर, काळजी करू नका. शेवटी साडेपाचला बोर्डिंग पास मिळाला, आणि इथून निघणार ह्याची खात्री झाली. मग कधीकाळी, काही का कारणाने असो, आपण ग्रीसला आलो होतो ह्याची आठवण असावी म्हणून तिथे फ्रीज मॅग्नेट विकत घेतली आणि बोर्डिंग गेट वर गेलो. पावणे सातची फ्लाईट साडेसातला सुटली. 


अथेन्स एअरपोर्टवर


हिथ्रो एअरपोर्टवर उतरल्यावर सर्वप्रथम ब्रिटिश एअर लाईन्सच्या काउंटरवर गेलो. त्या लोकांना सगळी कल्पना होतीच. त्यांनी आमची हॉटेलची, जेवायची, हॉटेलला जायची यायची सोय केली होती. त्या सगळ्यांची कुपन्स घेऊन फायनली आम्ही हॉटेलला पोहोचलो. गरम गरम जेवण करून रूम मध्ये जाऊन जो आडवा झालो. पण कशी बशी चार तास झोप झाली. भल्या पहाटे साडेचारला उठून परत हिथ्रो एअरपोर्टला निघालो. ह्यावेळी काहीही कटकट न होता शांतपणे वेळेवर टोरोंटोला उतरलो. उतरताना बाहेरचे दृश्य खूप सुंदर होते. सर्व परिसर बर्फाच्छादित होता. आम्हाला हे नवीन होते. ईमिग्रेशन पटकन झाले, आणि बॅगा घ्यायला गेलो. आमच्या चारही बॅगा पटापट आल्या. आता नूतनच्या बॅगा आल्या की निघायचे म्हणून त्याची वाट बघत बसलो. पण तिची एकही बॅग यायला तयार नाही. शेवटी बॅगेज चौकशी काऊंटरला गेलो. तिथल्या माणसाने बॅगेज स्लीप वरून बॅगा आल्या का नाही हे पाहिले. त्या आमच्या फ्लाईटने आल्याच नव्हत्या, दुसऱ्या फ्लाईटने निघाल्या होत्या. अथेन्सला ऐनवेळी एवढ्या लोकांच्या बॅगा इकडून तिकडे, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी कराव्या लागल्या म्हणून काही अडचणी निर्माण झाल्या असाव्यात. शेवटी त्यांनी तिथेच एक फॉर्म भरून घेतला, आणि लवकरात लवकर बॅगा घरी येतील असे आश्वासन दिले. बॅगा खरोखरीच त्याच रात्री, एअरलाइन्सच्या दिलगिरी पत्राबरोबर घरी पोचल्या.


अशा प्रकारे फायनली आमचा पुणे ते टोरोंटो हा सनसनाटी प्रवास संपन्न झाला. प्रसन्न आणि रोहन गाड्या घेऊन आलेच होते. एअरपोर्ट गेट ते कार हे अंतर स्वेटर, जॅकेट घालून सुद्धा कुडकुडत पार केले आणि एकदाचे घरी पोहोचलो. फ्लाईट डायव्हर्शन आणि बॅगा हरवणे हे, परत कधीही येऊ नयेत असे प्रकार, पहिल्यांदाच आणि एकाच प्रवासात अनुभवले.